ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26- राज्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारख्या एनपीए अधिक असलेल्या जिल्हा बँका शिखर बँकेत विलीन कराव्याच लागणार आहेत. परंतु ज्या बँकांची स्थिती बरी आहे. त्या बँकांना शेतक:यांना कर्ज देण्यासंबंधी नोटांचा किंवा रोकडचा पुरवठा चेस्ट बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका करीत नाहीत. सहकारी बँकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपा करीत असल्याचा आरोप शुक्रवारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जळगावातील पत्रपरिषदेत केला.
जिल्हा बँकांकडील कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करा, पण कर्जाची हमी द्या
जिल्हा बँकांची स्थिती नाजूक आहे. रोकड नसते, अशात जिल्हा बँकांना दिलेला कर्ज वितरणासंबंधीच्या लक्ष्यांकातील कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करण्यास हरकत नाही. पण राष्ट्रीयकृत बँका शेतक:यांना उभ्या करीत नाहीत. सुट, बूटवाल्यांना तेथे प्राधान्य असते. त्यामुळे जिल्हा बँकांकडील कर्ज वर्ग करताना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज शेतक:याला मिळेल, याची हमी, लेखी पत्र यंत्रणांनी जारी करावे, असेही गुलाबराव म्हणाले.
गिरीश महाजन यांची चौकशी व्हावी
दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला महाजन गेल्यासंबंधी जी चर्चा आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांचेच आदेश असल्याने याबाबत अधिक बोलणार नाही, पण जशी एकनाथराव खडसे यांची भोसरी प्रकरणात चौकशी झाली, तशी चौकशी या प्रकरणात व्हावी, जे वास्तव आहे, ते समोर यावे..दूध का दूध और पानी का पानी आपोआप होईल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.