गोपाल व्यास
बोदवड (जि. जळगाव) : एकीकडे कापसाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच दुसरीकडे तूर लागवडीतून तरी पैसा हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा असतानाच तुरीचे दर दहा दिवसांत दीड हजार रुपयांची घसरले आहेत. ९,७५० रुपये प्रतिक्विंटल असलेले तुरीचे भाव आता ८,१०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठाच पेच उभा राहिला आहे. यंदा तुरीचा हंगाम चांगला आला आहे. त्यात चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असताना तुरीचे भाव दिवसागणिक घसरत आहेत. शासनाने तुरीसाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात तूर ९,७०० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचली होती. आता शेतकऱ्यांनी शेतातील तूर काढायला सुरवात केली आहे. दहा दिवसांपूर्वी तुरीला ९७५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत होता. आता हे दर १५०० ते १६५० रुपयांनी खाली आले आहेत. बाजारात आता तुरीचे दर ८१०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात माल येतो तेव्हा दर कोसळतात ही स्थिती निर्माण झाली आहे.
कापूस : हमीभावाहून दर कमी, उत्पादक त्रस्त
अकोला - यंदा सततचा पाऊस, पूर आणि किडीच्या प्रादूर्भावामुळे राज्याच्या विविध भागात कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली आहेत.
अकोल्याच्या कापूस बाजारात २० डिसेंबरला सरासरी प्रतिक्विंटल दर ७,४०८ रुपये भाव मिळाला. जास्तीत जास्त दर ७,४७१ रुपये, तर कमीत कमी दर ७,३३१ रुपये एवढा होता. हा दर हमीभावापेक्षा कमी आहे.
खासगी बाजारात निकृष्ट दर्जाचे कारण देऊन परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पांढरा कापूस (कच्चा कापूस) रंग खराब होणे, स्टेपलची लांबी कमी होणे आणि आर्द्रतेचे कारण सांगून कापसाची खरेदी केली जात असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.=============