जळगाव : लग्नानिमित्त आयोजित गोंधळाच्या कार्यक्रमात दुचाकी घातल्याच्या कारणावरुन जळगावातील तांबापूर भागात दोन गटाकडून तुफान दगडफेक झाली. एका गटाकडून तलवारीचा वापर झाला. यात दोन्ही गटाकडील सात ते आठ जण जखमी झाले आहेत. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वत्र पळापळ झाली.
दीपक कडू थोरात (हटकर) या तरुणाचे १२ मे रोजी सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न ठरले. त्यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री गोंधळ आयोजित केला आला होता. यात भोलासिंग बावरी याने थेट मोटारसायकल घातली. यात गोंधळासाठी तयार करण्यात आलेली खोपडी तुटली. यामुळे संतापलेल्या हटकर गटाने बावरी गटावर दगडफेक केली. समोरच्या गटानेही मग त्यास दगडफेकीने प्रत्त्युत्तर दिले. बावरी गटाने केलेल्या तलवार हल्ल्यात दोन जण जखमी झाले. आकाश हटकर व शुभम पाटील या दोघांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरु होती. तांबापुरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कडू शंकर हटकर, उखा खंडू हटकर, त्र्यंबक शंकर हटकर, रवी राजू हटकर, दर्शनसिंग केमसिंग टाक, सुनींदरसिंग केमसिंग भाटीया व सुंदरसिंग बलवंतसिंग टाक असे जखमी झाले आहेत.