अॅड.सुशील अत्रे यांचे लिखाण : अॅन्टालिया येथील जागतिक पर्यटन परिषदेत समिर देशमुख यांच्याकडून घेतली माहिती
ऑनलाईन लोकमत विशेष
जळगाव,दि.12- तुर्कस्तानमधील अॅन्टालिया शहरात 6 एप्रिल रोजी जागतिक पर्यटन परिषद झाली. यात जळगाव येथील नामांकित वकील अॅड.सुशील अत्रे यांनी लिहिलेल्या ‘तरुण तुर्कस्तान’ या पुस्तकाने परराष्ट्रमंत्र्यांना मोहित केले. नेचर टूर्सचे संचालक समीर देशमुख यांच्याकडून त्यांनी या पुस्तकाबाबत माहिती घेतली.
पर्यटनाला वाव मिळावा यासाठी तुर्कस्तान शासनाने अॅन्टालिया येथे जागतिक पर्यटन परिषदेचे आयोजन केले. यासाठी जगभरातील 1500 पर्यटन संस्थांच्या संचालकांना निमंत्रित करण्यात आले. पर्यटन क्षेत्रात नवीन करण्याची जिद्द बाळगून असलेले नेचर टुर्सचे संचालक समीर देशमुख यांनी या परिषदेतील सहभागाची माहिती घेतली. त्यानंतर काही दिवसात त्यांना या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी जळगावातील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड.सुशील अत्रे यांनी मराठी भाषेतून लिहिलेल्या ‘ तरुण तुर्कस्तान’ या पुस्तकाची माहिती घेतली होती. सन 2009 मध्ये अॅड.अत्रे यांनी तुर्कस्तानला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तुर्कस्तानचा इतिहास, भूगोल आणि भूगोलाचा इतिहास या पुस्तकातून मांडला होता. नेमके तुर्कस्तानमध्ये जायचे असल्याने त्यांनी या पुस्तकाच्या काही प्रती अॅड.अत्रे यांच्याकडून मागवून घेतल्या. तत्पूर्वी परिषदेच्या आयोजकांनी देशमुख यांच्यासोबत मोबाईवरूनच संवाद साधत परिषदेच्या 36 तासांपूर्वी तिकिट पाठविले.
अॅन्टालिया शहरात दाखल झाल्यानंतर समीर देशमुख यांनी तीन दिवसीय जागतिक पर्यटन परिषदेत सहभाग घेतला. प्रशस्त आणि शिस्तबद्ध नियोजन असलेल्या या परिषदेचे उद्घाटन तुर्कस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मेव्हलट काव्हसोग्लू यांनी केले. उद्घाटन समारंभ आटोपल्यानंतर समीर देशमुख यांनी परराष्ट्र मंत्री मेव्हलट काव्हसोग्लू यांच्याकडे येत ‘तरूण तुर्कस्तान’ या पुस्तकाची प्रत दिली. मराठीत असलेले हे पुस्तक काव्हसोग्लू यांनी कुतुहलाने पाहिले. तसेच या पुस्तकाबाबत समीर देशमुख यांच्याकडून माहिती घेत पुस्तकाची एक प्रत स्वत:कडे घेतली. यावेळी परराष्ट व्यवहार मंत्रालयाच्या फोटोग्राफरला बोलवून घेत समीर देशमुखासह फोटो देखील काढून घेतला. पुस्तकातील तुर्कस्तानमधील पर्यटन आणि प्रवास वर्णनाबाबतची माहिती त्यांनी देशमुख यांच्याकडून जाणून घेतली. विशेष म्हणजे तुर्कस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पुस्तकाच्या अनावरणाप्रसंगी घेतलेला फोटो देखील देशमुख यांना पाठवित पर्यटनासंबधीचा सलोखा कायम ठेवला आहे.