(डमी ९२२)
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, ढगांच्या गडगडाटासह दरवर्षी विजादेखील पडत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानीदेखील होत असते. जिल्ह्यातदेखील वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात बाहेर असताना नागरिकांनी मोबाइल बंद करणे तसेच झाडांपासून दूर राहिल्यास अंगावर वीज पडण्याच्या शक्यतेपासून काही प्रमाणात सुरक्षित राहता येता येऊ शकते. विशेष म्हणजे मान्सूनच्या आगमनावेळेस वीज पडण्याचा घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. वीज पडताना प्राथमिक स्तरावर मोबाइल बंद करणे किंवा झाडाखाली उभे न राहणे अशी काळजी घेतली तरी विजेपासून काही अंशी सुरक्षित राहता येऊ शकते.
वीज पडताच ही घ्या काळजी
वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना मोबाइल फोन बंद ठेवा. तो चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग बंद करून चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. कदाचित फोन चालू असल्यास व त्यावर कॉल आल्यास घेऊ नका. तसेच शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे, झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
कोणाला किती मिळाली नुकसानभरपाई
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वीज पडून मृत झालेल्यांपैकी १२ जणांना नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यात सर्व शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाकडून विजांमुळे मृत पावलेल्या नागरिकांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाते. विशेष करून शेतात काम करणारे मजूर व शेतकऱ्यांसाठी शासनाने ही विशेष तरतूद केली आहे. तसेच विजांमुळे मृत पावणाऱ्यांमध्ये ८० टक्के शेतकरी व मजुरांचाच समावेश असतो. यासह मृत जनावरांबाबतदेखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात असते.
वीज पडल्याने झालेले मृत्यू
२०१८ - ११ मनुष्य , १९ जनावरे
२०१९ - १४ मनुष्य - १७ जनावरे
२०२० - ११ मनुष्य - २१ जनावरे
२०२१ - ५ मनुष्य - १० जनावरे
जिल्ह्यात २४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा
काही वर्षांमध्ये वीज पडून मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. या कारणांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा तयार केली जात असते. जळगाव जिल्ह्यात एकूण २४ ठिकाणी ही यंत्रणा प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आली आहे. यासह खासगी मोबाइल टॉवरवरदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने, आता ग्रामीण भागातदेखील मोबाइल टॉवरमुळे विजेपासून काही अंशी सुरक्षा ही मिळत असते. जळगाव शहरात महापालिकेसह अनेक शासकीय कार्यालयांवरदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.