ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 26 - ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर चलन तुटवड्यामुळे सर्वच जण बेजार आहेत. खातेदारांना पुरेशी रक्कम देता येत नसल्याने सोमवारी सेंट्रल बँकेच्या रावेर तालुक्यातील खानापूर सह ४ शाखा बंद ठेवण्यात आल्या. चलन टंचाईमुळे ग्रामीण भागात सर्वाधिक हालपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसात स्थिती सुधारून व्यवहार सुरळीत होतील असे आश्वासन दिले होते. मात्र आजही पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने बँकांची अडचण होत आहे. त्याचा फटका ग्रामीण भागाला सर्वाधिक बसत आहे. ग्रामीण भागात जिल्हा बँकांमध्ये खातेदारांना रक्कम मिळत नाही. आता सेंट्रल बँकेला देखील त्याचा फटका बसत आहे. पुरेशी रक्कम नसल्याने सोमवारी सेंट्रल बँकेने आपल्या चार शाखा बंद ठेवल्या. त्या आशयाची माहिती शाखा व्यवस्थापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली आहे.एटीएम मशिन बंदचजिल्हाभरात राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम मशिन आहेत. सद्यस्थितीला स्टेट बँक आॅफ इंडिया, अॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक वगळता अन्य बँकांचे एटीएम बंद आहेत. सेंट्रल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडियासह अन्य बँकांचे एटीएम पहिल्या दिवसांपासून बंद आहेत.धनादेशाचे व्यवहार दुप्पटीने वाढलेचलन तुटवड्यामुळे व्यवहार ठप्प झाले असताना कॅशलेस व्यवहार वाढत आहे. सध्या बँकांमध्ये धनादेशाद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांची संख्या दुप्पट झाली आहे. सेंट्रल बँकेसह अन्य बँकांनी आपल्या शाखांमध्ये धनादेश वटविण्यासाठी असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
चलन तुटवड्यामुळे सेंट्रल बँकेच्या चार शाखा बंद
By admin | Published: December 26, 2016 11:07 PM