लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहावीची परीक्षा रद्द झाली. पण, बारावीची परीक्षा होणार आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जुक्टो संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून कुठेही इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. शैक्षणिक कामकाज ऑनलाइन झाले. तसेच शहरी विभागातील ७० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा स्वीकार केला. परंतु ग्रामीण भागामध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही ऑनलाइन पध्दतीने पूर्ण करण्यात आला. पण, दुसरी लाट आल्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पण, राज्याच्या आठ विभागांमध्ये अजून बारावी परीक्षेबाबत कुठलाही निर्णय नसल्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे राज्यशासनाने बारावीच्या परीक्षा संदर्भात शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण तज्ञ या सर्वांचे मत जाणून घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घ्यावयाच्या या संदर्भात तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा. परीक्षेची पद्धत मूल्यमापनाचे निकष, मौखिक व प्रात्यक्षिक बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप या संदर्भात सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी शासनाकडे जुक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सचिव शैलेश राणे, कार्याध्यक्ष सुनील पाटील, नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड, डी.डी. पाटील, उपाध्यक्ष प्रा.राजेश बडगुजर, प्रा.संजय चौधरी, प्रा.संजय पाटील, प्रा.पी.पी. पाटील, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.भारती महाजन आदींनी केली आहे.