जळगाव : नाशिक विभागीय मंडळ कक्षेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च परक्षेच्या (इयत्ता बारावी) कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका व इतर साहित्य जिल्ह्यातील ४ वितरण केंद्रांवर गुरूवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप केल्या जाणार आहे.पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन जाहीर झाला असून त्यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ८९.७२ टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत़ बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धावपळ सुरू होते ती पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची़ मात्र, मुळ गुणपत्रिकाचं न मिळाल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येत आहे़ मुळ गुणपत्रिका महाविद्यालयात जमा करताचं, प्रवेश निश्चित केले जाणार आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा होती़ ती प्रतीक्षा आता संपली असून शुक्रवार, ३१ जुलैच्या दुपारी ३ वाजेपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे़ दरम्यान, गुणपत्रिका वाटप करत असताना कुठलीही गर्दी होणार नाही, याची काळजी महाविद्यालयांना घ्यावी, तसेच सोलश डिस्टन्सिंग पाळण्यात याव्या, आदी सूचना नाशिक विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे़.या केंद्रांवर होणार महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरणजिल्ह्यातील चार केंद्रांवर गुणपत्रिकांचे महाविद्यालयांना वितरण केले जाणार आहे़ त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाला सुरूवात होईल़ गुरूवारी सकाळी ११ ते ३ या वेळात चारही वितरण केंद्रांवर गुणपत्रिका महाविद्यालयांना सोपविण्यात येणार आहे़ जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना जळगाव शहरातील जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालयात तसेच भुसावळ, बोदवड, जामनेर मुक्ताईनगर, रावेर, यावल तालुक्यातील महाविद्यालयांना भुसावळमधील के ़नारखेडे, विद्यालय येथे तर चाळीसगाव, भडगाव पाचोऱ्यातील महाविद्यालयांसाठी चाळीसगावातील अे़बी़हायस्कूल हे वितरण केंद्र असणार आहे़ त्याचबरोबर अमळनेर, चोपडा, पारोळा तालुक्यातील महाविद्यालयांसाठी अमळनेर येथील डी.आर. कन्या हायस्कूल वितरण केंद्र असणार आहे़
बारावीच्या गुणपत्रिकांचे शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना होणार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 9:13 PM