उपेक्षित घटक एकसंघ होण्याची गरज
चाळीसगाव : महासंघाच्या बैठकीत आवाहन
चाळीसगाव : बारा बलुतेदार वर्षानुवर्षे दुर्लक्षित आणि वंचित असून या उपेक्षित समाजाला न्याय्य हक्काचा फारसा अधिकार मिळालेला नाही. या घटकाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन ताकद दाखविण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी सर्व उपेक्षित घटकांनी तयार राहण्याचे आवाहन बारा बलुतेदार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी चाळीसगाव येथे रविवारी महासंघाच्या संपर्क अभियानाच्या बैठकीत केले.
अध्यक्षस्थानी परिट समाजाचे प्रदेशाध्यक्ष किसनराव जोर्वेकर होते. महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी म्हणाले की, ओबीसी समाज आज लोकसंख्येने मोठा असूनही या समाजावर अन्याय होत आहे. राजकीय आरक्षण काढल्यामुळे राजकीय करिअर धोक्यात आले आहे. भविष्यात या घटकाने जागृत झाले नाही तर आणखी संकटातून मात करावी लागणार आहे. त्यासाठी विखुरलेल्या या समाजाला जागृत करून एकसंघ करण्यासाठी संपर्क अभियान सुरू केले असून त्याचा प्रारंभ चाळीसगावातून होत आहे.
किसनराव जोर्वेकर यांनी केंद्र सरकार याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याकडे दुर्लक्ष व बेसावध राहिले तर भविष्यात या घटकांची स्थिती अत्यंत बिकट राहील. आमचा अधिकार व हक्कासाठी लढा सुरू झाला असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा भारती कुमावत, प्रदेश सदस्य ईश्वर मोरे, साहेबराव कुमावत यांनी मनोगतात महासंघाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी उत्तमराव काळे, बा. निं. पवार, सोनाली गुरव, सुभाष रामोशी, भगवान रोकडे आदींनी चर्चेत भाग घेऊन आपापल्या समाजातील प्रश्न उपस्थित करून महासंघाच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
चौकट-
या बैठकीत प्रामुख्याने न्हावी, धोबी, शिंपी, तेली, सोनार, कुंभार, कोष्टी, गुरव, बेलदार, लोहार, सुतार, भोई, परदेशी, गोसावी, कुमावत, गोंधळी, धनगर, रामोशी आदी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून विविध मागण्याचा ऊहापोह करून महासंघाला पाठिंबा दिला.
फोटो ओळी :
चाळीसगाव येथे वंचित ओबीसीच्या संपर्क अभियान बैठकीत बोलतांना मुकुंद मेटकर सोबत व्यासपीठावर किशोर सूर्यवंशी, किसनराव जोर्वेकर, ईश्वर मोरे, भास्कर जुनागडे, भारती कुमावत व अन्य पदाधिकारी.