लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ सप्टेंबरपासून खाली असलेल्या कोरोना रुग्णवाढीचा आलेख फेब्रुवारीत अचानक वाढला आहे. गेल्या वीस दिवसात जिल्ह्यात ११८५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ४७८ ने वाढली असून आठडाभरातच कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने झाल्याचे चित्र समोर आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना शांत होता. रुग्णसंख्या शंभराच्या खाली असल्याने सर्वांना दिलासा होता. यामुळे कोरोना संपलाय असाही गैरसमज झाल्याने बेफिकीरी वाढली होती. जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा दौरा, या बाबी आता रुग्णवाढण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले असून नागरिकांनी आता अधिक दक्ष राहणे गरजेचे झाले आहे.
हा एक दिलासा
रुग्णवाढ समोर येत असली तरी यात गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. अधिकांश रुग्णांना लक्षणे नसणे, सौम्य लक्षणे असणे यामुळे हे रुग्ण होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. तज्ञांच्या मते होम आयसोलेशनचे नियम न पाळल्यानेही कोरोनाचा धोका वाढत आहे.
वाढत जाणारी रुग्णसंख्या
५७०३४ : आठवड्यापुर्वीची रुग्णसंख्या
५८२१९ : आठवड्यानंतरची रुग्णसंख्या
११८५ : रुग्णांची वीस दिवसात भर
४७८ : सक्रिय रुग्ण वाढले
७२८ : रुग्ण आठवडाभरात वाढले
असा राहिला आठवडा
सोमवारी - १२४
मंगळवारी - ६३
बुधवारी - ७४
गुरूवारी - १६९
शुक्रवारी - १४२
शनिवार - १४६
विवाह सोहळे ठरताय घातक
विवाह सोहळ्यांमध्ये केवळ ५० जणांना परवानगी असताना सर्व नियम धाब्यावर बसवून भर गर्दीत हे सोहळे पार पडत आहे. यात जळगाव शहरातील १० - १२ वऱ्हाडींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यासह शिरसोलीत लग्न घरातच नवरदेवास पाच जण बाधित आढळले. त्यामुळे ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरली असल्याचे चित्र आहे.