लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे बुधवारी मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त हजारोंच्या उपस्थित बारा गाड्या ओढण्यात आल्या. विशेष म्हणजे, या उत्सवादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असतानाही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत हा उत्सव साजरा करण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्बंधावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तालुक्यातील आव्हाणे येथे दरवर्षी मरीमाता यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेल्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी पार पडला आहे. प्रतीकात्मक स्वरूप म्हणून बारा गाड्याऐवजी एकच गाडे ओढण्यात आले असले तरी या कार्यक्रमादरम्यान हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
पोलिसांच्या उपस्थितीत हजारोंचा जमाव एकत्र होतोच कसा ?
आव्हाणे गावाचा यात्रा उत्सव असताना तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी सकाळपासून गावातच होते. त्यामुळे गावाच्या मुख्य बाजारपेठ भागात दुपारी तीन वाजेपर्यंत गर्दी झालेली नव्हती. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर गावातील बसस्थानक परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. त्यानंतर गावात बंदोबस्तासाठी अनेक पोलीस कर्मचारीदेखील दाखल झाले होते. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असतानादेखील गावाचा बारा गाड्या उत्सवादरम्यान हजारो नागरिक जमा झाले असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचा व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पहिल्या लाटेत आव्हाणे गाव होते कोरोनाचा हॉटस्पॉट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जळगाव आव्हाणे हे गाव हॉटस्पॉट ठरले होते. या गावात आतापर्यंत २४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी दिली, यावरदेखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जळगावसारख्या शहरापासून हे गाव केवळ ७ किमी अंतरावर असून या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम होत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोट.....
आमच्या हद्दीत लग्न लागू देत नाही. बारा गाड्यांचा विषय तर लांबच आहे. आव्हाण्यात कोणत्याही बारा गाड्या ओढल्या नाहीत. पोलिसांचे ठिकठिकाणी पाॅईंट लावण्यात आले आहेत.
- रविकांत सोनवणे, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे