संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : अनलॉक झाल्यानंतर प्रेमवीरांचे प्रेम उफाळून आले आहे. मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्याभरात अमळनेर पोलीस ठाण्याला बारा तरुण-तरुणी पळून गेल्याची नोंद झाली आहे. यातील काहींना तर कायद्याचे ज्ञान नसल्याने अल्पवयातदेखील घरातून निघून जाण्याचे धाडस केले आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिन्याभरात बारा तरुण तरुणी बेपत्ता झाले आहेत. यात १४ जुलैला सानेनगर भागातून ३२ वर्षीय तरुण काही न सांगता निघून गेला, १६ जुलैला सारबेटे येथून ३३ वर्षीय विवाहिता बँकेचे काम करून येते असे सांगून निघून गेली ती परतलेली नाही. १९ जुलैला २५ वर्षीय तरुणी स्टेट बँकेसमोर एका मित्रासोबत निघून गेली.
२१ जुलैला वर्णेश्वर झोपडपट्टीमधून २५ वर्षीय तरुणी काही एक न सांगता निघून गेली. २१ रोजी दहिवद येथून एक तरुण पुण्याहून पीएफचे पैसे घेऊन येतो असे सांगून निघून गेला, तर २२ जुलै रोजी २३ वर्षीय तरुणी दहिवद येथून काही एक न सांगता निघून गेली. २८ जुलै रोजी परीक्षेच्या नावाने २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. ३ ऑगस्ट रोजी एक तरुण रात्री साडेआठ वाजता ढेकू रोडवरून उसनवार पैसे परत देऊ शकला नाही म्हणून पैसे देणाऱ्याने कानशिलात मारल्याने रागात निघून गेला, ८ ऑगस्ट रोजी लोण बुद्रुक येथून २० वर्षीय तरुणी रात्री काही एक न सांगता निघून गेली , तर ११ ऑगस्ट रोजी पातोंडा येथील १९ वर्षीय तरुणी कॉलेजला जाते असे सांगून बेपत्ता झाली तर शहरातील गांधलीपुरा भागातील अल्पवयीन मुलगी पळवून नेण्यात आली, तर ११ रोजीच शिरूड नाका परिसरातील २७ वर्षीय तरुणी घरातून न सांगता निघून गेली आहे. असे महिनाभरात १२ तरुण-तरुणी बेपत्ता झाले आहेत.
यात काही तरुण मुलींबरोबर पळून गेल्याचे समजते; मात्र त्यांची हरवल्याची नोंद झालेली नाही.
अनेकदा मुलांसमोरच आई-वडिलांमध्ये वाद होतात. त्यामुळे मुलांना स्वतःच्या कुटुंबाची चीड निर्माण होते. त्यातून ते मित्र-मैत्रिणीचा शोध घेतात आणि एक दिवस कुटुंबाला सोडून जातात. काही कुटुंबात परक्या व्यक्तीशी झालेले प्रेमसंबंध मुलांना चुकीच्या मार्गाने नेण्यास मार्गदर्शक ठरतात.
कोट
हौस, मौज, श्रीमंत मूल-मुलींचे हेवे कर्ज उसनवारी करण्यास मजबूर करतात. त्यामुळेदेखील मुले, मुली वाईट मार्गाला जातात. तारुण्यात मूल-मुलींचे हार्मोन्स बदलतात त्यामुळे त्यांना त्या वयात समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना योग्य ते, संस्कार मूल्यांचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, अन्यथा ते चिडतात आणि कुटुंबात दुरावा निर्माण होतो. यामुळे पालकांनी मुलांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष घालणे आवश्यकच आहे.
- जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस ठाणे.
कोट
कुमार अवस्थेत भिन्न लिंगी आकर्षण असणारच त्यासाठी आई-वडिलांनी संस्कार घडविले पाहिजे. कडक शिस्त न ठेवता घरातच इतके प्रेम द्यावे की ते बाहेर प्रेम शोधणारच नाहीत. माध्यमानीदेखील संस्कारक्षम कार्यक्रमांवर भर द्यावा. - डॉ. नंदा तायडे-मोरे, मानसशास्त्र तज्ज्ञ, अमळनेर.