प्रमोद ललवाणी
कजगाव, ता. भडगाव : ३१ ऑगस्ट व नंतर ८ सप्टेंबरला लागोपाठ आलेल्या दोन महापुराने सारंच वाहतं झालं. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री या साऱ्यांचा पाहणी दौरा पार पडला. संगतीला शासकीय ताफादेखील हजर होता. पंचनाम्याचा सोपस्कारही पार पडला. आता नुकसानग्रस्तांच्या नजरा मदतीच्या घोषणेकडे लागल्या आहेत, मात्र त्याबाबत कोणी बोलायला तयार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पुरामळे शेत, विहिरी, पाईपलाईन हेदेखील सार वाहतं झालं. मोठ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. त्यासाठी बँकांनी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने आदेश करावे, अशीही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
१९९८ नंतर तितुर नदीला आलेल्या या महापुराने कजगाव परिसरातील चार खेड्यातील असंख्य शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे पीक काही तासात होत्याचे नव्हते झाले.
तब्बल २३ वर्षांनंतर तितुर नदीला एक नाही तर आठच दिवसात दोन महापूर आले अन नदीकाठावरील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास या महापुराने सरळ वाहून नेला. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
नदीकाठावरील दिव्यांग वयोवृद्ध शेतकरी शिवसिंग राजधर पाटील यांची पाच बिघे शेती केटीवेयरला लागून आहे. ३१ ला आलेल्या महापुरात संपूर्ण शेतातील कपाशी व कांदा हे पीक मुळासकट वाहत गेले. पुराच्या प्रवाहाने पाच बिघे शेतापैकी दोन बिघे शेतदेखील वाहून गेल्याने या जागेत १० ते १५ फुटांचा खड्डा पडला आहे.
विशेष बाब म्हणून शासन स्थरावरून मदतीचा हात मिळाला तरच हा दिव्यांग शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल. अन्यथा महापुरात जसं शेत वाहत झालं तसंच त्याचं स्वप्न वाहतं होईल. अशीच परस्थिती इतर शेतकऱ्यांचीदेखील आहे.
दुसऱ्या बाजूला असलेले शेतकरी शांताराम चौधरी यांची तर चक्क विहीर जमीनदोस्त झाली. महापुराचे पाणी सरळ शेतात गेल्याने नदीच्या काठावर असलेली विहीर पूर्ण कोसळली अन जमीनदोस्त झाली. सोबत सारी पाईपलाईन पुरात वाहून गेली. याच पद्धतीने रामसिंग सुपडू पाटील यांच्या शेतजमिनीसह व केळीची झाडे पुरात वाहून गेली.
मदत मिळण्यासाठी अनेक टप्पे पार पडतील. मग कुठे मोडकातोडका निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. तोपर्यंत बंजर झालेली शेती पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
करोडोंचा फटका
लागोपाठ एकाच आठवड्यात आलेल्या दोन महापुराने करोडो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले हातातोंडाशी आलेला घास या पुरात वाहता झाला. सोबत शेतजमिनीदेखील वाहिल्या. मंत्री, खासदार, आमदारासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, पंचनामे झाले. सारे सोपस्कार झाले. साऱ्यांनी गुळगुळीत आश्वासनेदेखील दिली, मात्र पूर येऊन २० दिवस उलटले, मात्र अद्याप मदतीची घोषणा नाही.
लक्ष आता मदतीकडे
महापुराच्या प्रवाहात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे सारे आर्थिक गणित चुकले. वर्षभराचा हिशोब विस्कळीत झाला आहे. दुसरीकडे कजगावसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या केटीवेयरचा भराव वाहून गेल्याने या केटीवेयरचे पाणी तेथून वाहत असल्याने या केटीवेयरचा भराव तत्काळ केला तरच त्यात पाणी थांबेल अन्यथा तो कोरडा पडेल व उन्हाळ्यात पुन्हा दुष्काळ पडेल.