विनायक वाडेकर मुक्ताईनगर : स्वयंअध्ययन व स्वयंप्रशिक्षण घेत मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा गावातील आधुनिक एकलव्य असलेल्या दीपक वाघ या तरूणाने सुरु केलेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल १२ तरुणांचा पोलीस दलात प्रवेश झाला आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे. हे गाव सध्या पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील जवळपास बारा विद्यार्थी ही पोलीस व समकक्ष दलात रुजू झाले आहेत.इच्छापूर-निमखेडी येथील ज्ञानपूर्ण विद्यालयाचा विद्यार्थी दीपक भीमराव वाघ याचे बालपणापासून पोलीस बनण्याचे ध्येय होते. त्यामुळे त्याने अकरावीपासूनच पोलीस भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम व प्रशिक्षणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने गावाला लागून असलेल्या एका छोट्याशा खोलीमध्ये स्व:ता अध्ययनाला सुरुवात केली. स्व:ता अध्ययन करीत असतानाच इतरांचेही अध्ययन व्हावे या दृष्टिकोनातून इतर विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.त्यातूनच २०१३/१४ च्या पोलीस भरतीमध्ये त्याला यश मिळाले. दीपकची नियुक्ती कारागृह पोलीससाठी झाली. सध्या तो गडचिरोली येथे आपली सेवा बजावत आहे. दीपक हा विद्यार्थ्यांना दिवसभर मार्गदर्शन करीत होता. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावाजवळच असलेल्या एका टेकडीवर शारीरिक चाचणीसाठी नेत असे. तेथे धावणे, गोळाफेक, लांब उडी, शंभर मीटर धावणे या सर्व चाचण्या तो स्वत: घेत होता.दीपकने याबाबत कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतांना, मात्र त्यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. सद्यस्थितीला महालखेडा या गावातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवल्या प्रशिक्षण केंद्रातून पोलिस दलात व अन्य समकक्ष दलात नऊ विद्यार्थी हे कायमस्वरूपी नोकरीवर लागलेले आहेत. तर तीन विद्यार्थी हे अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी रोज पहाटे चार वाजता उठून नियमितपणे शारीरिक चाचणी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करीत आहेत.
महालखेड्याची ओळख पोलिसांचे गावसद्यस्थितीला दीपक वाघ , विकी वाघ, नितीन वाघ, समाधान किरण कासवेकर, विनोद पाटील, चेतन पाटील, विवेक कांडेलकर, गणेश घुले व सुमीत तायडे हे तरुण पोलीस दलात रुजू झाले आहेत. तर मयूर तायडे,महादेव बेलदार, विश्वास पाटील हे तीन तरुण प्रतीक्षा यादीत आहेते. नऊ कायमस्वरूपी व तीन तरुण प्रतीक्षा यादीत असल्याने या गावाचे नाव पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मुक्ताईनगरचे तत्कालीन उपनिरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याचे वाघ सांगतात.
स्व:ता शिकणे व इतरांना शिकवणे या दोन्ही गोष्टीतून आपलाही अभ्यास होतो. प्रशिक्षणाची देखील तयारी होते. या हेतूने प्रेरित होऊन हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले पोलीस भरती केंद्र गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.-दीपक वाघ, पोलीस कर्मचारी.