जळगाव : गणेशोत्सवासाठी नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढून यंदा या उत्सवाच्या सुरुवातीलाच जळगावातून तब्बल ३५ ट्रक नारळांची विक्री होऊन यातून अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरम्यान, या वर्षी आवक चांगली असली तरी भाव वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कोणताही धार्मिक विधी तसेच सण-उत्सवासाठी नारळ अर्थात श्रीफळाला अनन्य महत्त्व असते. त्यात लाडक्या बाप्पाच्या स्थापनेत श्रीफळ कलश आवर्जूून असतोच. सोबतच अनेक मंडळ श्रीफळापासून गणराय साकारत असतात. गणेशोत्सव घरोघरी साजरा होण्यासह सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी असते. त्यामुळे घरगुती गणरायासाठी तसेच मंडळांकडूनही नारळाला मोठी मागणी वाढते. त्यानुसार यंदा तर या मागणीमध्ये वाढ झाली आहे.३५ ट्रक नारळदक्षिण भारतातून आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यामधून जळगावात नारळाची आवक होते. गणेशोत्सवाचा काळ लक्षात घेता जळगावातील व्यापाऱ्यांनी नारळांची आगाऊ नोंदणी केली होती. त्यानुसार मागणीनुसार यंदा नारळाचा पुरवठा झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिवसेंदिवस मंडळांची संख्या वाढती असल्याने त्याचा अंदाज घेत व्यापाऱ्यांनी यंदा जादाच मागणी नोंदविली होती. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जळगावात तब्बल ३५ ट्रक नारळाची आवक झाली. १२० नारळांची एक गोणी असते व एका ट्रकमध्ये २८० गोण्या बसतात. ३५ ट्रक नारळ विक्रीची आकडेवारी पाहिली तर ११ लाख ७६ हजार नारळांची अर्थात जवळपास १२ लाख नारळांची खरेदी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी केली. या सर्वांची उलाढाल पाहिली तर ती अडीच कोटीच्या जवळपास जाते.निम्म्याहून अधिक मागणी शहरातदक्षिण भारतातून आलेल्या नारळांच्या ३५ ट्रकपैकी २० ट्रक नारळांची केवळ जळगाव शहरात विक्री होते तर १५ ट्रक नारळांना ग्रामीण भागातून मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे निम्म्याहून अधिक जास्त नारळ केवळ जळगाव शहरातच विक्री होत असल्याचे दिसून येते.भावात वाढगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नारळाच्या भावात काहीसी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एका गोणीचे होलसेल भाव एक हजार ४०० रुपये होते. ते या वर्षी एक हजार ५०० ते एक हजार ५५०वर पोहचले आहेत. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळाची आवक कमी झाली होती व आता सण-उत्सवात ही मागणी वाढल्याने भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले.महिनाभरात ६० ट्रक नारळ विक्रीगणेत्सवासोबतच पोळा, राखी पौर्णिमेलाही नारळाला मागणी असते. राखी पौर्णिमेला औक्षण करताना बहीण आपल्या भावाला श्रीफळ देत असते. तसेच पोळा सणालाही मान म्हणून नारळ दिले जाते. त्यामुळे गेल्या महिनाभरापासूनच नारळाला मागणी वाढली आहे. राखीपौर्णिमेपासून आतापर्यंत नारळातील उलाढाल पाहता ६० ट्रक नारळांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेत्सवापाठोपाठ आता नवरात्रात नारळांना आणखी मागणी वाढणार आहे.गणेत्सवासाठी नारळांना मोठी मागणी वाढून या उत्सवासाठी जवळपास ३५ ट्रक नारळांची विक्री झाली. राखीपौर्णिमेपासून नारळांना मागणी वाढली आहे. यंदा नारळाच्या भावात थोडी वाढ झाली आहे.- अशोक धूत, नारळ व्यापारी.
‘श्रीं’ना अडीच कोटींचे श्रीफळ अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:07 PM