गोदामाला लागलेल्या आगीत अडीच लाखाचे कुरकुरे खाक
जळगाव : मोहाडी रस्त्यावरील खुबचंद साहित्या टॉवरला लागून असलेल्या गोदामाला सोमवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. त्यात गोदामात ठेवलेले अडीच लाख रुपये किमतीचे कुरकुरे व इतर जनरल वस्तू जळून खाक झाल्या. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, अग्निशमन बंबाद्वारे ही आग विझविण्यात आली. सोमवारी सकाळीच या दुकानात माल भरण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मोहन अस्वार (वय ३६ रा. रामेश्वर कॉलनी) यांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कुरकुरे पाकिटांचा होलसेल व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी त्यांनी मोहाडी रोडवरील खूबचंद साहित्या टॉवर जवळ भाड्याने एक गोदाम घेतले आहे. सोमवारी सकाळीच त्यांनी सुमारे अडीच लाखांचा माल गोदामात ठेवला होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक गोदामाला आग लागल्याने कुरकुऱ्यांचे पाकिटे जळून खाक झाली आहे. हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. एका बंबाद्वारे तसेच स्थानिक नागरिकांना मिळेल तेथून पाणी आणून आग विझविली. आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. एमआयडीसी पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला.