कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार महावितरण प्रशासनाने ग्राहकांचे घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, सरासरी वीजबिले दिली. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेली सरासरी वीजबिले ही अवाजवी असल्याचे सांगत, अनेक ग्राहकांनी तक्रारी करून वीजबिले भरण्याकडे पाठ फिरविली आहे. यामुळे महावितरणचा थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तेराशे कोटींच्या घरात हा आकडा पोहचला आहे. या थकबाकी वसूल होण्यासाठी महावितरणतर्फे खान्देशात जोरदार कारवाई मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तेराशेंच्यावर ग्राहकांची कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणच्या कारवाईमुळे एकीकडे ग्राहकांनी वीजबिल भरण्याला आता प्राधान्य दिले असतांना, दुसरीकडे खान्देशातील अडीच लाख ग्राहकांनी दहा महिन्यात वीज बिल भरण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.
इन्फो:
सर्वाधिक बिल न भरणारे ग्राहक जळगाव जिल्ह्यातील
दहा महिन्यात एकदाही बिल न भरणाऱ्या ग्राहकांपैकी जळगाव जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार १०४ ग्राहक असून, यांच्याकडे ९२ कोटींची थकबाकी आहे. तसेच धुळे जिल्ह्यात ७६ हजार ८३६ ग्राहक असून, यांच्याकडे ५६ कोटींची थकबाकी आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात ४४ हजार ३२३ ग्राहक असून, यांच्याकडे २२ कोटींची थकबाकी आहे.
इन्फो :
या ग्राहकांवर कारवाई सुरू
महावितरणने कृषिपंपधारक ग्राहक वगळता सर्व ग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले असून, हप्त्याने वीजबिल भरण्याचींही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, दहा महिन्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक या तिन्ही वर्गवारीतील ग्राहकांनी एकदाही वीजबिल न भरल्यामुळे महावितरणतर्फे या ग्राहकांवर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत यातील किती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला गेला, याची माहिती स्थानिक कार्यालयापर्यंत उपलब्ध झाली नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.