फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मालवाहू वाहनाचे टायर पंक्चर झाल्यानंतर तेथे मदतीचा बहाणा करून व्यापाऱ्याची २ लाख ६ हजार रुपये रोकड असलेली बॅग लांबविणाऱ्या विशाल उर्फ नाना संजय तेली (वय २३) सागर संजय पाटील (वय २०, दोन्ही रा. पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून २० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातगाव डोंगरी, ता.पाचोरा येथील भिकन आनंदा पाटील (४५) हे शेतकरी व भूईमुंगाच्या शेंगा खरेदी विक्रीचे व्यापारी आहेत. व्यापारामध्ये अस्लम नवाब फकीर हे त्यांचे भागीदार आहेत. १० मे रोजी परिसरातून ४१ क्विंटल ९० किलो भुईमुगाच्या शेंगा घेऊन ते मालवाहू वाहनाने ( क्र.एम.एच.०५ एस. २६९९) धुळ्याला गेले. तेथे या शेंगा विक्री केल्यानंतर त्याचे २ लाख ६ हजार ६९९ रुपये घेऊन परत याच वाहनाने सातगाव येथे येत असताना भडगाव येथे पाचोरा रस्त्यावर शासकीय आयटीआय जवळ रात्री ११.३० वाजता वाहन पंक्चर झाले. वाहन रस्त्याच्या बाजूला लावून चालक पंक्चर काढत असताना मागून दुचाकीवरून तीन जण आले. रस्त्याच्या बाजूला लागलेले वाहन पाहून त्यांनी पुढे जाऊन दुचाकी मागे वळवली. पाटील यांना आम्ही तुमची मदत करतो असे सांगून पंक्चर काढण्यासाठी एकाने चाक बदलण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. यावेळी दुसराही मदत करायला लागला. काही क्षणातच दोघांनी नजर चुकून गाडीतील बॅग काढून पुढे गेले. त्यांच्यामागे तिसरा दुचाकी घेऊन गेला. पुढे तिघे जण बॅग घेऊन पसार झाले. थोड्या वेळाने पाटील यांनी बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. दुचाकीस्वारांवर संशय आल्याने पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
चालकच निघाला फुटीर
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भडगाव पोलिसांनी चालक विशाल तेली याच्यावर संशय व्यक्त करून तीन, चार वेळा त्याची चौकशी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. चालक, व्यापारी व त्यांचा भागीदार या तिघांची पार्श्वभूमी तपासली. तसेच या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, राजेंद्र पवार यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले. या पथकाने सर्वात आधी चालकाला ताब्यात घेतले. काही गुप्त माहिती व पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चालकाने गुन्ह्याची कबुली दिली. सोबत असलेल्या सागर व शाहरुख यांचे नावे सांगितली. त्यानुसार सागरला ताब्यात घेण्यात आले. तिसरा शाहरुख तडवी (रा.पाचोरा) हा फरार झाला. अटकेतील दोघांनी २० हजारांची रोकड काढून दिली. उर्वरित रकमेत तिघांनी मौजमजा केली.