लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लिफ्टसाठी लागणारे स्पेअरपार्ट खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यावसायिकाची सुमारे ७ ते १० लाखात फसवणूक केल्याप्रकरणी छत्तीसगढ पोलिसांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातील एका हॉटेलातून दोन जणांना अटक केली. विजय मुरलीधर महाजन (३६), पवन शिवाजी पाटील (२६, दोन्ही रा. अहमदाबाद) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
अहमदाबाद येथील विजय महाजन व पवन पाटील हे दोघे रुग्णालय तसेच अपार्टमेंटमध्ये लिफ्ट बसविण्याचे काम करतात. विजय याने छत्तीसगढ येथील रायपूरमधील मोहम्मद आमीर यांच्याकडून लिफ्टसाठी लागणारे स्पेअरपार्ट खरेदी केले केले. मात्र, त्या खरेदी केलेल्या मालाची रक्कम न देता सुमारे ७ ते १० लाखांत मोहम्मद आमिर यांची फसवणूक केली होती. त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगढमधील रायपूर पोलीस ठाण्यात विजय याच्याविरुद्ध २६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, विजय व त्याचा साथीदार पवन हे दोघे जळगावात असल्याची माहिती छत्तीसगढ पोलिसांना मिळाली. त्यानुसार छत्तीसगढ येथील एएसआय शिवकुमार साहू, अमित यादव व विक्रांत वर्मा असे पोलिसांचे पथक शनिवारी सकाळी जळगावात दाखल झाले होते. नंतर त्या पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यातील डीबीतील पोलीस कर्मचारी रतन गीते व प्रफुल्ल धांडे यांना संपूर्ण घटना सांगितली. गीते व धांडे यांनी तपासचक्र फिरविल्यानंतर त्यांना विजय व पवन हे नवीन बसस्थानक परिसरातील एका हॉटेलात थांबले असल्याची माहिती मिळाली. लागलीच त्यांनी हॉटेल गाठत दोघांना ताब्यात घेऊन छत्तीसगढ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर दुपारी हे पथक छत्तीसगढ येथे रवाना झाले होते.