भुसावळ : शहरातील जामनेर रस्त्यावरील दिनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात वीजप्रवाह असल्याने शॉक लागून दोघा भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेस जबाबदार कोण? यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. घटना घडताच पेट्रोल पंपावर एकच गर्दी जमा झाली.सदर पेट्रोल पंपावर कारंजा करण्यात आला आहे. या ठिकाणी बाजूलाच असलेल्या इंदिरा नगरातील रहिवासी गणेश शंकर राखोंडे आणि दीपक शंकर राखोंडे (वय अंदाजे ११ आणि १२) ही दोघे भावंडे खेळत होती. या पाण्यात विज प्रवाह उतरल्यामुळे दोघा बालकांना शॉक लागून मृत्यू झाला. घटना घडताच या बालकांना शेजारील खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आपल्या चिमुकल्या मुलांचा मृतदेह पाहून मातेने हंबरडा फोडला. यावेळी नागरिकांची गर्दी झाल्याने संपुर्ण रस्त्यावर वाहतुक ठप्प झाली होती. किमान तासभर वाहतुक विस्कळीत झाली होती. दोघा भावंडांचे मृतदेह गोदावरी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
शॉक लागून दोघा भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 10:28 PM