जळगाव : महाबळ व आदर्श नगरात धाडसी घरफोडी करणाऱ्या मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (१८)व सोनूसिंग जगदिशसिंग बावरी (२२ ,दोन्ही रा.तांबापुरा जळगाव) या दोन अट्टल चोरटे भावंडाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख २४ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.महाबळमधील श्रीधर नगरातील उदय प्रल्हाद थोरात यांच्याकडे ५ जानेवारी २०२० च्या रात्री बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३ लाख ५८ हजार ६५० रुपयांचे दागिने लांबविले होते, त्यानंतर २१ जानेवारीच्या रात्री आदर्श नगरातील लायन्स क्लबजवळील उपकोषागार अधिकारी नसीम हमीद तडवी (५२) यांच्याकडेही घरफोडी होऊन दीड लाखाचे दागिने लांबविण्यात आले होते.या दोन्ही घटनांबाबत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी चोरी, घरफोडीचा आढाव घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार राजेश मेंढे, संजय हिवरकर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी,सुनील दामोदरे, गफुर तडवी, महेश महाजन यांचे पथक तयार केले होते. घरफोडीतील दागिने मोड करण्यासाठी काही चोरटे सराफाकडे येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार हे पथक सलग तीन दिवसापासून सराफ बाजारात गस्त घालून संशयितांच्या मागावर होते. रविवारी मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (१८)व सोनूसिंग जगदिशसिंग बावरी (२२ ) या दोन्ही भावंडाना तेथेच पकडण्यात आले. त्यांच्याजवळ २ लाख २४ हजार रुपये किमतीचे दागिने होते. या दोघांना सायंकाळी रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:12 PM