जळगाव : गेल्या महिन्यात आठ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच आढळून आल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा सायंकाळी सात वाजता समता नगरातील वंजारी टेकडी या भागातून समीर रमजान पिंजारी (वय ९) व रेहान शेख निजाम (वय १०) हे दोन मुले गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, या हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी समता नगर गाठून माहिती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत या भागात प्रचंड गर्दी व तणाव निर्माण झाला होता. समीर व रेहान ही दोन्ही मुले त्र्यंबक नगरातील शाळेत शिक्षण घेतात. दोघं जण साडे पाच वाजता घरी आले. घरी दप्तर ठेवल्यानंतर दोघंही वंजारी टेकडी या भागात खेळायला गेले. सात वाजले तरी मुले घरी आली नाहीत, त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध घेतला. मेहरुण तलाव, समता नगर, खदान या भागात त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरीही कुठेच त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी रामानंद नगर पोलिसांत तक्रार केली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, प्रदीप चौधरी व सहकाऱ्यांनी माहिती घेतली.गेल्या महिन्यात १३ जून रोजी आठ वर्षीय बालिका खेळायला गेली असता गायब झाली होती. दुसºया दिवशी धामणगाववाडा टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेहच आढळून आला होता. आदेशबाबाने तिच्यावर अत्याचार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता ही मुले गायब झाल्याने या भागात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा या भागात आहे.खान्देशात मुले पळविण्याच्या संशयवारुन जमावाकडून बाहेरील व्यक्ति दिसल्यास मारहाण होण्याच्या घटना घडत असताना जलगावतून ही मुले गायब झाल्याने वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहे.
जळगाव येथील समता नगर भागातून दोन मुले बेपत्ता; पालकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 1:02 AM