पहूर, ता.जामनेर/चुंचाळे, ता.यावल : या ठिकाणी सोमवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बैलांसह दोन गायींचा डोहात बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच व्यक्तींसह एका बैलासह गायीला वाचविण्यात नागरिकांना यश आले.पहूरजवळील पेठमधील रहिवासी रवींद्र तुळशिराम पाटील हे बैलगाडीसह वाघूर नदीतील काळ््या डोहात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी गेलेले दोन युवकही पाण्यात बुडू लागले. यामुळे झालेल्या आक्रोशाने विठ्ठल पांढरे व शुभम पांढरे (२१) या पितापुत्रासह काही युवकांनी जिवाची पर्वा न करता बुडत असलेल्या तिघांनाही वाचविले. मात्र बैलजोडी पाण्यात गतप्राण झाली तर गाय वाचली आहे.सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. बुडत असताना वाचविलेल्या तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रक्रुती चांगली असल्याचे सांगितले आहे.प्राप्त माहितीनुसार पेठ, ता. जामनेर येथील रहिवासी रवींद्र तुळशिराम पाटील हे बैलगाडीत पाण्याची टाकी घेऊन शेतात जात होते. यादरम्यान पाटील यांनी वाघूर नदीत पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीतील पाण्याची टाकी भरण्यासाठी उतरविली. नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बैलगाडीसह रवींद्र पाटील काळा डोहाकडे ओढल्या जाऊन पाण्यात बुडत असताना सागर रामराव जोमाळकर (२८) व पल्लेश देशमुख (२७) यांनी त्यास वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. त्यावेळी हे दोघेही बुडू लागल्याने या ठिकाणी प्रचंड आक्रोश झाला.
पेठमधील ही घटना कळताच विठ्ठल पांढरे व त्यांचा मुलगा शुभम पांढरे यांनी प्रथम डोहात उड्या घेतल्या. तिघांना वाचविण्यासाठी पाण्यात थरार सरू असतानाच गोकूळ उत्तम देशमुख या युवकाने पाण्यात उडी घेतली. प्राण वाचवण्याकरीता शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यादरम्यान ईश्वर मुंजाळ, अक्षय गोंधनखेडे, विष्णू पांढरे, चेतन पाटील, दिपक सावळे आदी युवकांची मदत लाभली. यामुळे रवींद्र पाटील, सागर जोमाळकर व पल्लेश देशमुख यांना वाचवित यश आले.पाण्याच्या बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी प्राथमिक उपचार केले. यावेळी रेल्वे सेंट्रल बोर्डचे सदस्य रामेश्वर पाटील, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख यांच्यासह शंभरावर नागरीक रूग्णालयात उपस्थित होते. या युवकांना जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.बैल जोडी ठारपाण्यात गाडीबैल बुडून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याची मोठी हानी झालीे. गाडीला बांधलेल्या गायीला तत्काळ सोडल्याने तिचे प्राण वाचले. याघटनेने मात्र पहूरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा महसुल विभागाच्या वतीने पंचनामा करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात पाठविण्यात आल्याचे तलाठी कार्यालयाकडून सांगितले आहे.‘लोकमत’चे आवाहनअजिंठा घाटमाथ्यावर अधूनमधून पाऊस सुरू आहे. वाघूर नदीचा उगम या घाटमाथ्यावरून आहे. त्यामुळे अचानक वाघूर नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाढ होणे सुरू असल्याने पाण्याचा अंदाज घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधव व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी नदीपात्रात पाण्याचा अंदाज घेऊनच जावे. वाकोद, वडगाव, पिंपळगाव बद्रूक, पिंपळगाव खुर्द, हिवरी दिगर, हिवरखेडा दिगर, पहूर पेठ, पहूर कसबे, खर्चाने, नाचनखेडा, भिलखेडा, भराडी व इतर गावांनी सतर्क राहावे.तसेच पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने शेतीकामासाठी जाताना नदीपात्राचा अंदाज घेऊन पशुधनाची काळजी घ्यायला हवी.बाप्पाने गावावरचे संकट टाळलेगावात लाडक्या बाप्पाच्या स्थापनेची लगबग सुरू होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. ढोलताशांचा निनादात बाप्पाचे आगमन सुरु असताना ही घटना घडली. मात्र याघटनेतून तिघांना जीवदान मिळाले. बाप्पाने गावावरचे संकट टाळले, अशी भावना नागरिकांतून व्यक्त झाली.दुस-या घटनेत चुंचाळे येथे डोहाच्या पाण्यात बैलगाडी घसरून झालेल्या घटनेत एक बैल व दोन गायी दगावल्याची घटना घडली. मात्र बैलगाडी चालक कृष्णा पाटील यांना वाचविण्यात यश आले.येथून जवळच असलेल्या मानकी शिवारात काठेवाडी यांचा रहिवास असुन गुरे चराई व राखणदारी करीता चुंचाळे येथील कृष्णा अमरसिंग पाटील व नितिन मधुकर पाटील हे दोघे बैलगाडीला दोन गाई बांधुन साकळी शिवारातील पाटचारी जवळ राहणारे काठेवाडी यांच्याकडे गुरे चारण्याकरीता व रखवालदारी करीता पोहोचविण्यासाठी जात होते. बैलगाडीस दोन बैल तसेच मागे दोन गायी बांधण्यात आल्या होत्या.मानकी शिवारातील पाटचारी जवळ भिका सुकदेव भिल, रा.वाघोदा हे बकरी व गुरे चारीत असताना कोणीतरी वाचवा, असा आवाज भिका भिल यांच्या कानावर आल्याने त्यांना कोणीतरी डोहात बुडत असल्याचा अंदाज आला व त्यांनी डोहाकडे धाव घेतली. भिका भिल यांनी डोहात बुडत असलेल्या कृष्णा पाटील सह नितिन पाटील यांना वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करीता अंदाजे २० ते २५ फुट खोल असलेल्या डोहात तात्काळ उडी घेऊन कृष्णा पाटील, नितिन पाटील आणि गाडीला जुंपलेला दोघा बैलापैकी एक बैलास बाहेर काढले. मात्र एक बैल व दोन गायींना वाचविण्यात यश आले नाही.बैल बिथरल्याने झाला प्रकारसविस्तर असे अचानक बैलजोडी बिथरल्याने बैलांनी जोराने पळायला सुरूवात केली. बैलगाडी हाकणारे कृष्णा पाटील व सोबत असलेला नितिन पाटील या दोघाने बैलगाडी सावरता आली नाही. व डोहाकडे बैल धावल्याने घसरून हा प्रकार घडला. बैलगाडीवरील दोघांसह बैलास जिवदान देणाºया भिका भिल याचे कौतुक होत आहे.नागरिकांनी घेतली धावया घटनेची वार्ता वाºयासारखी सर्वत्र पसरली. चुंचाळे, वाघोदा, गिरडगाव, साकळी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत्युमुखी पडलेल्या गाईंना चुंचाळे येथील दोन पोहणारे पानबुडे गोकुळ कोळी व राजू पाटील यांनी डोहात झेप घेऊन दोन्ही गाईंना डोहातून बाहेर काढले.किनगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रतिलाल भगुरे व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती पाटील यांनी घटनास्थळी मुत्युमुखी पडलेल्या एक बैल व दोन गाईंचे शवविच्छेदन केले. ४० हजार किमतीचा बैल व ३०-३० हजार रूपये किमतीच्या दोन गाई असा एक लाख नुकसानीचा पंचनामा तलाठी राजेश तेल्हरकर यांनी केला.