लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. रात्री संभाजीनगर येथील एका दुकानात तर धरणगावाचे ग्रामदैवत मरीआईचा मंदिरातील धूमाकुळ घालत चोरट्यांनी दानपेटी लंपास केली.
धरणगाव शहरामध्ये मागील काही दिवसापासून चोरट्यांचे सत्र सुरू आहे. काही दिवसापूर्वी स्वामी समर्थ नगर मधील एका घरात रात्री कोणीच नसताना कुलूप तोडून धाडसी चोरी झाली. आज रात्री संभाजीनगर येथील रहिवासी योगेश नवनीत पाटील यांना घराच्या बाजूला असलेल्या आपल्या मालकीच्या गुरुकृपा सर्व्हिसेस नामाच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरांनी दुकानाची कडी-कोयंडा व कुलूप तोडून दुकानात असलेला दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
त्याचप्रमाणे चोरट्यांनी संभाजीनगर जवळच असलेल्या संजयनगर परिसरातील धरणगाव शहराचे ग्रामदैवत मरीआई मंदिराचे कुलुप तोडून, देवीचा चांदीचा मुकुट, नाकातील नथ व दानपेटीमधील मागील चार महिन्यापासूनचे दान चोरीला गेल्याची घटना सकाळी लक्षात आली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरी करताना चोराचा चेहरा कैद झाला. कॅमेरात दोन युवक चोरी करताना दिसत आहेत. कॅमेराचा वेळेनुसार चोरी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान झाल्याचे कळते
मरिमाता ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पैलवान व दुकान मालक योगेश पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद नोंदवली असून, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पुढील तपास करत आहेत. या दोन्ही घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोऱ्यांचे सत्र लवकर बंद होण्याची मागणी संपूर्ण शहरात होत आहे.