रविवारी गुरांचा बाजार भरण्याची प्रथा चोपडा येथे आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत पूर्णपणे आठवडे बाजार आणि गुरांचा बाजार भरणे बंद ठेवावेत, असा आदेश होता. तोच आदेश कायम करून जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जिल्ह्यात कोठेही आठवडे बाजार आणि गुरांचा बाजार भरणार नाही, असे सक्तीने बजावले आहे. मात्र, चोपडा येथे या आदेशाला बगल देण्यात आली आहे.
दर रविवारी मार्केट कमिटीच्या गेटसमोर चोपडा-यावल रस्त्यालगत देशमुखनगरला लागून गुरांचा बाजार अर्थात बैलबाजार भरविला जात आहे. बाजारात प्रचंड गर्दी होत असते. बाजारातील व्यवहार होऊ दिले जातात. त्यानंतर, साडेअकरा ते बारा वाजेला पोलीस हा भरलेला बाजार हटविण्यासाठी येतात. एवढेच नाही, शहरातील अतिशय गजबजलेल्या अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी असते.
रविवारी भाजीपाला विकणारे हातगाडी विक्रेते, हातगाडीवरून फळ विक्रेते, नगरपालिका इमारतीसमोर असलेले रत्नावती नदीवर दोन समांतर पुलांवर स्टेशनरी वस्तू विकणारे हातगाडी धारक, पथारी टाकून लिंबू, कोथिंबीर विक्री करणारे विक्रेते, लोखंडी वस्तू विकणारे विक्रेते हे सर्वच सुरू असते, तसेच चोपडा शहरातील एमआयडीसीच्या मागच्या बाजूला बकरी बाजारही भरविला जात असतो. त्याकडे तर कोणाचेच लक्ष नाही.
या सर्व बाबींकडे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर तिसरी लाट चोपडा येथे सुरू होऊ शकते. कारण दिनांक १६ रोजी चोपडा तालुक्यात तीन रुग्ण नवीन कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. कदाचित ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. म्हणून सोमवार ते शुक्रवार व्यावसायिकांना व्यवसायाला संधी दिलेली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार तंतोतंत बंद पाळला गेला पाहिजे, अशी कोरोनात होरपळून निघालेल्या परिवारांची मागणी आहे.