जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीचा विचार केला तर यंदा पक्षाने तीन नवीन चेहऱ्यांना दिलेल्या संधीनंतर या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात युती असतानाही मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी केल्यामुळे या मतदार संघासोबतच अमळनेरात गेल्या वेळी अपक्ष असलेले आमदार शिरीष चौधरी यांना भाजपने दिलेले संधी व चाळीसगाव मंगेश चव्हाण यांना दिलेल्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, २०१४मधील विजयी सहा उमेदवारांपैकी चार जणांना पुन्हा भाजपने संधी दिली आहे तर दोन पराभूत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असून त्यातील अनिल भाईदास पाटील यांना अमळनेरात तर जगदीशचंद्र वळवी यांना चोपड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीदेखील दिली आहे.२०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी युती नसल्याने भाजप व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी भाजपने सर्व ११ जागी उमेदवारी दिली होती. त्यात सहा मतदार संघात त्यांना विजय मिळविता आला.या विजयी उमेदवारांमधील जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. या सोबतच जळगाव शहर मतदार संघातून आमदार सुरेश भोळे यांच्या गळ््यात या वेळीही उमेदवारीची माळ पडली आहे. भुसावळमध्येही संजय सावकारे तर रावेरमध्ये हरिभाऊ जावळे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. मात्र उन्मेष पाटील यांची खासदारकीपदी वर्णी लागली तर मुक्ताईनगरातून विजयी एकनाथराव खडसे यांना उमेदवारीच नाकारण्यात आली.दोघेही पराभूत या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार२०१४मध्ये अमळनेर मतदार संघातून भाजपचे उमेदवार असलेले अनिल भाईदास पाटील यांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी पराभव केला. त्या नंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यंदाच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. चोपडा मतदार संघातदेखील २०१४मध्ये भाजपकडून निवडणूक लढविणारे व पराभव झालेले जगदीशचंद्र वळवी हे देखील राष्ट्रवादीमध्ये गेले. तेदेखील या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.तिघा पराभूतांपैकी एकजण अलिप्त२०१४मध्ये पराभव झालेल्या तीन उमेदवारांपैकी या वेळी केवळ दोनच जण सक्रीय आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघातून पराभव झालेले पी.सी. पाटील यांचा या वेळीही महायुतीचे उमेदवार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना विरोध असून ते भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारात आहेत. याशिवाय मच्छिंद्र पाटील (एरंडोल) हे चिमणराव पाटील यांचा प्रचार करीत आहेत. मात्र उत्तमराव महाजन (पाचोरा) हे अद्यापही प्रचारात दिसून येत नाही.