लोकमत न्यूज नेटवर्क पाचोरा (जि. जळगाव) : रेल्वे रूळ ओलांडताना कामायनी एक्स्प्रेसखाली सापडून महिलेसह दोन जण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना पाचोरा-परधाडेदरम्यान रेल्वे वळण रस्त्यावर रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीला वाचविताना पतीचा मृत्यू झाला आहे.
रत्नाबाई माधवराव पाटील (६१, रा. दुसखेडा, ता. पाचोरा) आणि अशोक झेंडू पाटील (६०, रा. पहाण, ता. पाचोरा), अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे, ता. पाचोरा येथे सप्ताहानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. तो आटोपून रत्नाबाई पाटील, अशोक पाटील व त्यांची पत्नी बेबाबाई पाटील, असे तीन जण परधाडेहून दुसखेडा गावाकडे जवळच्या मार्गाने पायीच निघाले होते. परधाडे- पाचोरा रेल्वे रूळ ओलांडताना अचानक मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसखाली सापडून रत्नाबाई व अशोक पाटील हे दोघे जागीच ठार झाले. तत्पूर्वी, रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच अशोक पाटील यांनी त्यांच्या पत्नीस तत्काळ बाजूला सारल्याने त्यांच्या पत्नी बचावल्या आहेत. डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली.
मृतदेह दोन तास तसेच पडून ही घटना घडल्यानंतर मृतदेह दोन तास घटनास्थळीच पडून होते. पाचोरा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती उशिरा मिळाली. खासगी रुग्णवाहिकाचालक अमोल पाटील, किशोर लोहार, बबलू मराठे यांनी घटनास्थळी जात मृतदेहांची जुळवाजुळव करून ते पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले होते.