पारोळा : जोरदार पावसामुळे लेंडी नदीला पूर आल्याने उंदिरखेडे येथील दोन शेतकरी पुरात अडकले होते. ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून त्यांना बाहेर काढण्यात यश आले.तालुक्यातील चोरवड, जोगलखेडे परिसरात २१ रोजी दुपारी दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उंदिरखेडे येथील लेंडी नदीला पूर आला. त्यात दोन शेतकरी अडकल्याने भीतीचे वातावरण पसरले होत. मात्र तीन ते साडेतीन तासांच्या गावक-यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. शेतकरी मोटरसायकलने शेतातून घरी निघाले असता नदी दुथडी वाहत होती. पात्र पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने कैलास पंडीत पाटील (५६) व धर्मराज अभिमन देसले हे दोघे मोटरसायकल नदीमधुन नेत असताना पाण्यात अडकले. पाण्याचा प्रवाह पाहता आपली दुचाकी निघणे शक्य नसल्याने या दोघे नदीमध्ये असलेल्या खडकावर उभे राहिले. ही बातमी उंदिरखेडे गावात व परिसरात पसरताच नदी काठावर गांवक-यांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी त्यांच्यापर्यंत दोर फेकले. त्यांनी दोर धरून ठेवित सुमारे साडेतीन तासाच्या अवधीनंतर रात्री ८ .३० वाजता नदीला पाणी कमी झाल्या नंतर दोघे सुखरूप बाहेर आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश बापुराव पाटील, चेतन पाटील, राजु देसले आदींनी परिश्रम घेतले.
लेंडी नदीच्या पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 9:57 PM