जळगाव - फक्त 200 रुपये द्या आणि तुम्ही सांगाल त्या मुलाच्या हातात कॉपी दिली जाईल, असा सर्रास प्रकार जळगाव शहरात शुक्रवारी इंग्रजीच्या पेपरला सुरू होता. कॉपी पुरविणारी टोळी परीक्षा केंद्राच्या आसपासच्या परिसरात फिरत होती. या टोळीच्या कुणाच्याही हातात 200 रुपये दिली की, कॉपी थेट वर्गात पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेंचपर्यंत पोहोचत होती. अखेरच्या एका तासात तर कॉपी मोठ्या प्रमाणात सुरू होती. विशेष म्हणजे बंदोबस्तातील पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
कोरोना नियमांचे पालन
सकाळी १०.३० वाजता सर्व परीक्षार्थींना तपासणी करून आत घेण्यात आले. त्यात मुलांच्या शरीराचे तापमान घेण्यात आले तसेच त्यांची तपासणी करून त्यांना वर्गात सोडण्यात आले. त्यानंतर पेपरला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यावर ११.३० वाजेच्या सुमारास कोर्ट चौक परिसरातील एका महाविद्यालयाच्या परिसरात सर्वच बाजूंनी कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती. त्यात एक पांढरा शर्ट घातलेल्या मुलाने कॉपीचे काही तुकडे खिशातून काढले आणि महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकाच्या हातात दिले. या सुरक्षा रक्षकाने आत ज्याला द्यायची आहे. त्याचा सीट क्रमांक आणि ब्लॉक क्रमांक विचारला. त्यानंतर त्या कॉपी पुरवणाऱ्याने सुरक्षा रक्षकाच्या हातावरच सीट क्रमांक लिहून दिला आणि त्यानंतर तो सरळ केला. त्यावेळी त्याच्याशी संवाद साधला असता. त्याने थेट ऑफरच दिली. दोनशे रुपये आणि सीट क्रमांक द्या.. थेट तुमच्या मुलाच्या हातात जाऊन कॉपी दिली जाईल. हा सुरक्षा रक्षकच मुलाच्या हातात कॉपी देईल. त्याला काहीही अडचण होणार नाही.’ त्याचप्रमाणे दुसऱ्या एका महाविद्यालयाच्या मागच्या बाजूलादेखील मोठ्या प्रमाणात कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती. खाली असलेल्या दुकानांच्या छतावर चढून वर्गात खिडकीत कॉपी पुरवण्याचा प्रकार सुरू होता.
३० मिनिटात प्रश्नपत्रिका बाहेर
प्रश्नपत्रिकेची माहिती फक्त २५ ते ३० मिनिटात बाहेर आली होती. त्यानंतर तातडीने कॉपी तयार झाली आणि लगोलग मुलांच्या हातात देण्यात आली.
अनेक केंद्रांवर सर्रास कॉपी
गणेश कॉलनी परिसरातील एका महाविद्यालयातही बारावीचे केंद्र होते. तेथे देखील बाहेर टवाळ आणि कॉपी पुरवणाऱ्या मुलांची मोठी गर्दी होती. दुपारी १२.३० च्या सुमारास नूतन मराठा महाविद्यालयात कॉपीसाठी कागद आत देणारा मुलगा लगेच थेट बाहेती महाविद्यालयाच्या परिसरातदेखील पोहोचला होता; मात्र तेथे त्याने फार उचापती केल्या नाहीत.