जळगाव : पॉलिसी रकमेवरील आयकर व स्टेट ट्रान्स्फर चार्जेसच्या नावाखाली प्रमोदकुमार मुगतलाल शाह (रा़. आदर्शनगर) या वृध्दाची ४५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांना कानपूर व दिल्ली येथून दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. राहुल दिनेशकुमार पांडे (रा. कानपूर, उत्तर प्रदेश) व रूपेश कुमार गिरिजानंद (रा. दिल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून दोघांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पॉलिसीची ९४ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम मिळविण्याचे आमिष दाखवून सर्व्हिस चार्ज, सिक्युरिटी डिपॉझिट तसेच आयकर व स्टेट ट्रान्स्फर चार्जेसच्या नावाखाली मितेशकुमार सिंग व अशोककुमार सिंग यांनी आदर्शनगरातील प्रमोद शाह यांना ४५ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला होता. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पुष्पेंदरकुमार रामदिन कनौजिया हा सायबर पोलिसांना १२ जुलै रोजी गवसला होता. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार राहुल पांडे व रूपेश कुमार यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती दिली होती.
एकाला कानपुरातून, तर दुसऱ्याला दिल्लीतून अटक
संशयित राहुल पांडे हा दिल्लीत असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांनी १८ जुलै रोजी दिल्ली गाठली. परंतु, राहुल हा कानपूर येथे गावी निघून गेला होता. पोलिसांनी कानपूर गाठून तेथून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने साथीदार रूपेश याची माहिती दिली. त्यानुसार दिल्लीतील लक्ष्मीनगरातून रूपेश याला पोलिसांनी अटक केली.
'रूपेश'चे बनावट कॉल सेंटर
दरम्यान, दिल्लीतील लक्ष्मीनगरात रूपेश कुमार याचे बनावट कॉल सेंटर असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून कानपूर येथून दिल्लीला रवाना केली होती. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
शुक्रवारी गंडा घालणाऱ्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, अरविंद वानखेडे, पंकज वराडे यांनी केली आहे.