जळगाव : लॉकडाऊनमध्ये सर्वच दारु विक्रीची दुकाने बंद असल्याने त्याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील भोलाणे शिवारात गावठी दारु निर्मिती करुन त्याची तस्करी करण्याचा डाव बुधवारी तालुका पोलिसांनी उधळून लावला. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी पहाटे पाच वाजता भोलाणे येथे तापी नदीपात्रात सुरु असलेला गावठी दारु निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले.कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र आस्थापना बंद आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन काही जण भोलाणे येथे तापी नदी पात्रात गावठी दारु तयार करुन त्याची परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे रविकांत सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोनवणे यांनी सहकारी वासुदेव मराठे व इतरांना सोबत घेऊन बुधवारी पहाटे पाच वाजताच तापी नदीचे पात्र गाठले. पोलीस आल्याची चाहूल लागल्यानंतर मद्यनिर्मिती करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी ५ ते सकाळी ९.३० या वेळेत एकूण ५ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यात ७ हजार ६०० लिटर कच्चे, पक्के व काही उकळते रसायन होते. त्याची किंमत १ लाख ५२ हजार रुपये इतकी आहे. त्याशिवाय ३२ हजार २०० रुपये किमतीची तयार झालेली गावठी दारु, २० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, ३५ लीटरच्या २३ टाक्या , ३८ पत्री टाक्या असा एकूण २ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारु व रसायन पेटत्या भट्टीत नष्ट करण्यात आल्या. अज्ञात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दोन लाखाची गावठी दारु व रसायन नष्ट, तस्करी करण्याचा डाव पोलिसांनी उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 1:14 PM