जळगाव : लॉकडाऊन काळात जिल्ह्याच्या हद्दीतून दोन लाख १७ हजाराच्यावर मजूर परप्रांतात रवाना झाले आहेत तर एकट्या जळगाव शहरातून ६ हजार ४४८ मजूर प्रशासनाने बसच्या माध्यमातून परप्रांताच्या सिमेवर सोडले आहेत. दरम्यान, प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतर आरटीओकडून कोंबून मजूर वाहतूक करणाऱ्या १६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ३०४ बसेसद्वारे जिल्ह्यातून या मजुरांना सीमेपर्यंत सोडण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने राज्य व जिल्ह्याच्या सीमा सील केल्या होत्या. त्याआधी मजुरांची फरफट होत असल्याने अनेक मजुरांना पायी चालत तर काहींनी ट्रक, दुधाचे टॅँकर याचा वापर करुन आपआपली राज्य गाठली. पहिल्याच लॉकडाऊन काळात हजारोंच्या संख्येने मजुरांचे लोंढे रवाना झाले. तीन महिन्यात दोन लाखाच्यावर मजूर जिल्ह्यातून मार्गस्थ झाले. दरम्यान, हे लोंढे रोखण्यासाठी परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. तेव्हापासून जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाने १६२ ट्रकवर कारवाई करुन ५५ ट्रक जप्त केले होते. या ट्रकमधील मजुरांना परिवहन महामंडळाच्या बसमधून रवाना करण्यात आले होते. जिल्ह्याच्या सिमा तपासणी नाक्यावर आरटीओ, महसूल व पोलीस विभागाने केलेल्या नोंदीनुसार दोन लाखाच्यावर मजूर जिल्ह्यातून मार्गस्थ झाले.तीन राज्यात प्रशासनाने केली सोयजळगाव जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रशासनाने ३०४ बसेसची व्यवस्था केली होती. त्यातून ६१ बस छत्तीसगड, २०० बसेस मध्य प्रदेश व १ बस तेलंगणा तर उर्वरित बसेस गुजरात राज्याच्या सिमेपर्यंत पाठविण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. दरम्यान, याच काळात आरटीओच्या पथकाने २६ वाहने तपासली त्यात दोषी वाहनधारकाकडून कर स्वरुपात ४४ हजार ३७० तर दंड स्वरुपात २९ हजार ३०० अशी एकूण ७३ हजार ६७० रुपये वसूल करण्यात आले.ट्रक व इतर वाहनांमध्ये कोंबून मजुरांची वाहतूक केली जात असल्याने प्रशासनाने अशा वाहनांवर कारवाई करुन त्यातील मजुरांना सरकारी बसेसद्वारे सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. १७ मे पासून शासनाच्या आदेशानुसार परप्रांतीय मजुरांना सरकारी बसेसद्वारे राज्यांच्या सिमेपर्यंत सोडण्यात आले. त्याआधी अनेक वाहनातून मजूर गेले. त्याची नोंद नाही. जळगाव शहरातून ६ हजार ४४८ मजुर बसेसद्वारे रवाना केले.-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीजिल्ह्याच्या हद्दीतून गेलेले एकूण मजूर -२,१७,०००
लॉकडाऊनमध्ये दोन लाख मजूर जिल्ह्यातून मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:03 AM