लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र गुरवनंदुरबार : बोराळे येथील जवान मिलिंद किशोर खैरनार हे काश्मिरात शहीद झाल्याची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. मिलिंद यांच्यावर त्यांच्या मूळ गाव असलेल्या बोराळे, ता. नंदुरबार येथे गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिलिंद यांना भेटण्यासाठी वडील किशोर खैरनार हे चंदीगड येथे गेले होते. पण मिलिंद हे काश्मिरात होते. दोन महिने चंदीगढला थांबूनही त्यांची भेट होऊ शकली नाही. मंगळवारीच ते नाशिक येथे परतले आणि बुधवारी सकाळी मुलगा शहीद झाल्याची वार्ता त्यांना समजली.शहीद मिलिंद यांचे मूळगाव बोराळे, ता.नंदुरबार असले तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण त्यांच्या वडिलांच्या नोकरीनिमित्त बाहेरच गेले आहे. केवळ सण, उत्सव किंवा कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते कुटुंबासह या ठिकाणी एकत्र येत होते. त्यांचे वडिलोपार्जित घर या ठिकाणी असून काका तुकाराम खैरनार हे येथे राहतात. साधे पत्र्याचे घर असलेल्या खैरनार कुटुंबीयांची परिस्थिती साधारण आहे. सकाळी मिलिंद यांच्या शहीद होण्याची वार्ता धडकताच शोककळा पसरली. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे काका, काकू यांचे अनेकांनी सांत्वन केले. सरपंच पूनमचंद पटेल, उपसरपंच यशवंत भिल यांच्यासह गावातील मंडळी तेथे दाखल झाली.बोराळे येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या परिवाराने घेतला आहे. शासनाला तसे कळविण्यात आले. तहसीलदार नितीन पाटील यांनी गावात भेट देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणाºया तापी काठावरील जागेची पाहणी केली. त्या ठिकाणी सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय इतरही विविध शासकीय अधिकाºयांचा राबता सुरू झाला आहे.गुरुवारी दुपारी शहीद मिलिंद यांचा मृतदेह बोराळे येथे येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.मिलिंद यांचे वडील किशोर खैरनार व आई हे त्यांना भेटण्यासाठी ते कुटुंबासह राहत असलेल्या चंदीगढ येथे गेले होते. परंतु काश्मिरमधील परिस्थितीमुळे किशोर खैरनार यांना सुटी मिळाली नाही.त्यामुळे दोन महिने थांबूनही मुलाशी त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ते मंगळवारी सायंकाळी नाशिकला पोहचले आणि बुधवारी सकाळी किशोर हे शहीद झाल्याची वार्ता त्यांना मिळाली. दोन महिने मुलाच्या घरी थांबूनही त्याची भेट होऊ शकली नाही, आणि घरी येताच त्याच्या शहीद होण्याची घटना समजल्याने आई-वडिलांना दु:ख अनावर झाले. ते बोराळेकडे येण्यास निघाले आहेत.मिलिंद यांच्या मृत्यूची बातमी घेताच बुधवारी गावातील चुली पेटल्या नाहीत. यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत सरपंच पूनमचंद पटेल यांनी सांगितले. मिलिंद आमच्या गावाच्या दृष्टीने गौरवाची बाब होती. थेट हवाईदलात सामील होणारे ते एकमेव जवान होते.मिलिंद यांचे काका राहत असलेल्या घराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यातही मोठे खड्डे होते. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्ती ट्रॅक्टरद्वारे मुरूम आणून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे.
दोन महिने चंदीगढला थांबूनही मुलाची भेट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:35 PM
शहिद मिलिंदच्या वडिलांची खंत : मंगळवारीच परतले नाशिकला; बोराळे गाव सुन्न
ठळक मुद्देबोरोळेत दिवाळी साजरी न करण्याचा निर्णयदोन महिने थांबूनही मुलाची भेट नाहीबोराळे येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार