जळगाव : उसनवारीची रक्कम फेडण्यासाठी चालवायला दिलेला ट्रक परस्पर विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. दीपक उर्फ भय्या अरुण पाटील (४०, रा. चोपडा) व मुकेश शांताराम चौधरी (३२, रा. धरणगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
कैलास सोनू चव्हाण हे धानवड येथील रहिवासी असून, ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी त्यांनी नीलेश परदेशी (रा.आसोदा) याच्याकडून उसनवारीने २० हजार रुपये घेतले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ती रक्कम ते फेडू शकले नाही. ती रक्कम काही दिवसांत देईल, असे चव्हाण यांनी सांगितल्यानंतर परदेशी यांनी एक ते दोन महिन्यांसाठी तुझा ट्रक मला चालविण्यासाठी दे, मी त्यातून भाडे वसूल करून २० हजार कमवून घेईल व तुझा ट्रक परत करेल, असे सांगितले. त्यानुसार परदेशी याला मालट्रक दिला. त्याने तो परस्पर विक्री केला. अखेर ही बाब लक्षात येताच चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बुधवारी एकाला, तर गुरुवारी दोघांना अटक
मंगळवार, १३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर बुधवारी नीलेश परदेशी हा पोलिसांना गवसला. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीत नीलेश यांची कसून चौकशी केली असता, त्याने ट्रक दीपक पाटील व महेश चौधरी यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गुरुवारी चोपडा व धरणगावातून दोघांना अटक केली. तसेच ट्रकची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
शुक्रवारी नीलेश परदेशी याची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे शुक्रवारी नीलेश, दीपक व मुकेश तिघांना न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, इमरान सय्यद, मुदस्सर काझी, योगेश बारी, सचिन पाटील आदींनी केली आहे.