लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सोमवारी दोन कोरोना बाधित आढळून आले असून ग्रामीणमध्ये एकही रुग्ण समोर आलेला नाही. दुसऱ्या लाटेतील ही नीचांकी नोंद असून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे हे दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, ३९ रुग्णांनी जळगाव तालुक्यात कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहरात २५२ तर ११० रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील धरणगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जळगाव ग्रामीण या ठिकाणी एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. सोमवारी जिल्हाभरात ३०६५ कोरोनाच्या ॲन्टिजन चाचण्या झाल्या तर आरटीपीसीआरचे १६१४ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात २७ बाधित आढळून आले आहेत. चाचण्यांचे प्रमाण दिवसागणिक कमी-अधिक होत आहे. शासकीय यंत्रणेत आता तपासणीसाठी स्वत:हून समोर येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून हेच चित्र जळगाव शहरात आहे. जिल्ह्यात दोन तालुके सोडले तर सर्वच ठिकाणी ५ पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील यंत्रणेत दाखल रुग्ण
कोविड केअर सेंटर : ९६
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर : ५५३
डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल : १७२
जीएमसीत रुग्ण घटले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची संख्या आता कमी होत असून रविवारी १३८ रुग्ण दाखल होत तर सोमवारी ही संख्या १२० वर आली होती. तर या ठिकाणी म्युकरचे २५ रुग्ण उपचार घेत आहेत.