विक्रम दौलत चौधरी (५२) व भूषण अनिल पाटील (१८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी दुपारी तळई परिसरात ढगाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. गावाजवळील पांढरीच्या शेतातील काही लोक झाडाखाली थांबले होते. याच झाडावर अचानक वीज कोसळली आणि त्यात शेतकरी जागीच ठार झाला तर भूषण हा जखमी झाला. त्याला जळगावकडे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तळईचे माजी सरपंच अशोक महाजन यांनी दिली. भूषण हा ११ वीत शिक्षण घेत होता. पाऊस सुरू झाल्याने या शेतातील झाडाखाली सात जण थांबून होते. इतर पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
वीज पडून दहा जण बेशुद्ध
दुसरीकडे जीन्सी ता. रावेर येथे एका शेतात वीज पडल्याने दहा जण बेशुद्ध पडले आहेत. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.