जळगाव : खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे यासह वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन (५१), टोळी सदस्य दादू उर्फ विशाल जगदीश महाजन (२३) दोघे रा. चाळीसगाव या दोघांना सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार, २९ मार्च रोजी दिले.
जगदीश महाजन व दादू महाजन या दोघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, घातक हत्यार बाळगणे असे वेगवेगळे गंभीर १० गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोहेको विनोद भोई, पोलिस नाईक तुकाराम चव्हाण, महेंद्र पाटील यांनी तयार करुन पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दोघांना सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले. प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार यूनुस शेख इब्राहिम, पोहेको सुनील दामोदरे यांनी पाहिले.