ऑनलाईन लोकमत
जळगाव ,दि.2 - भुसावळ-नशिराबाद मार्गावर सुरु असलेली अवैध प्रवासी वाहतुकीवरील कारवाई न करण्यासाठी 200 रुपयांची लाच घेणारा नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचा:याला अटक तर लाचेची मागणी करणारा शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा:याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार याचे भुसावळ ते नशिराबाद या दरम्यान प्रवासी वाहतुकीचे वाहन आहे. प्रवासी वाहतूक करीत असताना कारवाई न करण्यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी चंद्रकांत विक्रम पाटील (36, रा.पिंप्राळा) यांनी तक्रारदार यांच्याकडे 200 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 1 वाजता नशिराबाद टोल नाक्याजवळ सापळा लावण्यात आला. पथकाने 200 रुपयांची लाच घेतांना चंद्रकांत पाटील यांना अटक केली. याच तक्रारदाला शहर वाहतूक शाखेत कर्मचारी असलेले लक्ष्मण बाबूलाल पाटील (रा.शाहू नगर) यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीचीदेखील पडताळणी केली असता लक्ष्मण पाटील यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने पाटील याला शाहू नगरातील निवासस्थानाहून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.