कारवाईसाठी गेलेल्या दोन पोलिसांना
मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न
फत्तेपूरची घटना : एकास अटक
जामनेर जि. जळगाव : निर्धारित वेळेनंतर सुरू असलेला बाजार हटविण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केली. एकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना फत्तेपूर (ता. जामनेर) येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. यात एकास अटक करण्यात आली आहे.
फत्तेपूर येथे वेळेची मर्यादा संपल्यानंतर बाजारातील दुकाने सुरू होती. हा बाजार हटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्ड गेले होते. त्यावेळी युसूफ शब्बीर खाँ पठाण, अश्रद युसूफ पठाण, महेमुद शब्बीर खाँ पठाण, इजाज महेमूद पठाण व मोहसीन महेमूद पठाण (रा. फत्तेपूर) यांनी पोलिसांना विरोध केला. यामुळे गोंधळ उडाला. गर्दी जमा झाली. या गोंधळातच पोलिसांना मारहाण झाली. तसेच सुरवाडे यांच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाचजणांविरुद्ध पहूर पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अश्रद पठाण याला अटक करण्यात आली आहे, तर चारजण पसार झाले आहेत.