रावेर : शहरातील एम. जे. मार्केटमधील सुरज प्रोव्हिजन व इंडिया क्रिएशन या दुकानांची कुलूप तोडून, शटर वाकवून काजू - बदाम ड्रायफ्रुट, सिगारेट पाकीटे व शर्ट - फूलपॅन्ट अशा रेडीमेड कपड्यांवर चोरट्याने डल्ला मारला. ही बाब गुरुवारी पहाटे उघडकीस आली.दरम्यान, गुन्ह्याची हातोटी ओळखून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून चार तासात सराईत घरफोडी करणारा महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (रा. निंबोल ता. रावेर) यास गजाआड केले आहे.एस. टी. बस स्टँडसमोरील एम. जे. मार्केटमधील तळमजल्यातील किराणा दुकान व पहिल्या मजल्यावरील रेडीमेड दुकानाचे कुलूप तोडून व शटर वाकवून आरोपी ज्ञानेश्वर उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी याने ड्रायफ्रुट,फुलपँट व शर्टच्या नवीन ड्रेसेसवर डल्ला मारला होता.अशोक मुलचंदानी यांनी रावेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून रावेर पोलिसात भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दुकानाच्या घरफोडीची हातोटीची पध्दत ओळखून व सराईत घरफोड्या करणारा महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी हा जिल्हा उपकारागृहातून सुटून आल्याची माहिती प्राप्त झाल्याने, फौजदार नाझीम शेख, पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी, कॉन्स्टेबल भरत सोपे, पोलीस नाईक रोहील गणेश यांचे पथक रवाना केले. पथकाने अवघ्या चार तासात आरोपीस ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने लंंपास केलेल्या आठ हजार ५०० रुपयांचा काजू, बदाम, सिगारेट पाकीटे व ड्रेसेसचा मुद्देमाल जप्त केला.
रावेर येथे दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 6:07 PM