लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर ५८ प्रकारच्या ॲलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची सीसीआयएमने परवानगी दिल्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील दोन हजार स्पेशालिस्ट डॉक्टर्सनी सहभाग नोंदविला. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत बाह्यरुग्ण विभाग बंद होता. यामुळे काही प्रमाणात रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.
आयएमएने देशव्यापी बंद पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर जळगावातही रुग्णालये बंद राहणार असल्याचा इशारा आयएमएने गुरुवारीच दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ९ वाजता आयएमए हॉलमध्ये पदाधिकारी, डॉक्टरांची बैठकही पार पडली. यात ज्या ज्या पॅथींनी त्या त्या पॅथींचे काम करावे, अन्य पॅथींमध्ये अतिक्रमण करून नये आणि असे अतिक्रमण करणे हे चुकी आणि घातक असल्याचा आरोप यावेळी आयएमएने करीत सीसीआयएमने घेतलेल्या निर्णयाचा निषेध नोंदविला. दुपारी १२पर्यंत ही बैठक होती. यासह निवदेनही देण्यात आले. बैठकीला आयएमएचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अनिल पाटील, डॉ. विलास भोळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. अनिता भोळे, डॉ. भरत बोरोले, डॉ. दिलीप महाजन, डॉ. धिरज चौधरी आदींसह आयएमएचे सदस्य आणि डॉक्टर उपस्थित होते.
बाहेरील रुग्णांनी टाळले
स्पेशालिस्ट डॉक्टरांनी ओपीडी तसेच नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवल्या होत्या. शिवाय आधीच एक दिवस आधी कळविले असल्याने अनेक बाहेरील रुग्णांनी वैद्यकीय सेवेसाठी जळगावात येणे टाळले हाेते, तर काहींना परतावे लागले होते. सायंकाळी ६ वाजता ओपीडी सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, रुग्णसेवेवर थोड्या प्रमाणात परिणाम जाणवला होता.
विद्यार्थ्यांचा पाठिंबा
आयएमएच्या या बंदला आएमए मेडिकल स्टुडंट नेटवर्कच्या अध्यक्षांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील संघटनेचे अध्यक्ष एमबीबीएसचे विद्यार्थी शुभम भोलाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे विद्यार्थी श्रीकांत केदार यांच्यासह पाच पाच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शासकीय यंत्रणेत रुग्ण वाढले
शुक्रवारी एमडी, एम, स्पेशालिस्ट डॉक्टरांकडील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने आयुर्वेद महाविद्यालयात नेहमीपेक्षा रुग्णसंख्या वाढली होती. या ठिकाणी मात्र नियमित व सुस्थितीत रुग्णसेवा सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशांत सुपे यांनी दिली.
फोटो आहे.