जळगाव : जनता कर्फ्यूदरम्यान सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने या काळात दाणाबाजार असोसिएशनच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी दोन ट्रॅक्टर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
किराणा दुकानांसह सर्वच दुकाने बंद ठेवली जाणार असल्याने या बंदच्या काळात बाजारपेठेत साफसफाई करण्याचा निर्णय दाणाबाजार असोसिएशनने घेतला. त्यानुसार पहिल्या दिवशी दाणाबाजारातील मुख्य रस्ता व या मार्गावर असलेल्या दुकानांसमोर साफसफाई करण्यात आली.
मनपाच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत मनपा कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजता साफसफाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करीत दोन ट्रॅक्टर कचरा गोळा केला. १३ व १४ रोजीदेखील ही मोहीम राबविली जाणार आहे.
यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, राधेश्याम तिवारी, लक्ष्मीकांत वाणी यांच्यासह इतरही व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत साफसफाईला हातभार लावला.