जळगाव : दुचाकी चोरट्यांनी आता डोकेवर काढले असून, शहरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी शहर व रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीष विजय पटेल हे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच.१९.एवाय. ३९७३) ही आयुक्त बंगल्याजवळील रेल्वे गेट रिक्षा स्टॉपजवळ उभी केली होती. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांना दुचाकी तेथून गायब झालेली दिसून आली. परिसरात शोध घेऊनही मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याची खात्री झाली. अखेर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र नामदेव पाटील कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी रात्री यांनी त्यांच्या अपार्टमेंटजवळ रिक्षा उभी केली होती. शुक्रवारी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या रिक्षामधील बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे कळले. तसेच अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची दुचाकी सुद्धा चोरट्याने अपार्टमेंटच्या आवारातून चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.