लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगरपालिकेच्या शाहू महाराज रुग्णालय व डी.बी. जैन रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, यात कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस हा शाहू महाराज रुग्णालयात दिला जात असून कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांनी शिवाजी नगरातील डी.बी. जैन रुग्णालयात जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाहू महाराज रुग्णालयात नियमित सरासरी ३०० जणांचे लसीकरण होत आहे. या केंद्रावर अन्य केंद्रांच्या तुलनेत अधिक लसीकरण होत आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहे. ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस कोविशिल्डचाच घ्यायचा आहे. त्यामुळे दोन केंद्रांवर दोन वेगवेगळ्या डोसचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांना पहिला डोस घेणाऱ्यांनी शाहू महाराज तर काेविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांनी डी.बी. जैन रुग्णालयात जावे, असे आवाहन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
चार केंद्रांना मंजुरी
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी शासनाकडून केंद्र वाढविण्यात आले आहे. त्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेव्यतिरिक्तच्या पंधरा खासगी रुग्णालयांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार शहरातील दोन खासगी व जिल्ह्यातील अन्य दोन खासगी अशा चार नवीन खासगी केंद्रांना लसीकरणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.