जळगाव: अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करून तहसीलकार्यालयाच्या आवारात जप्त केलेले डंपर व ट्रॅक्टर गुरूवार, २८ रोजी रात्री विनापरवानगी पळवून नेल्याचा प्रकार शुक्रवार, २९ रोजी उघडकीस आला. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला ऊत आला आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे वैजनाथ येथील तसेच अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील वाळू ठेकाही रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. खापरखेडा ठेक्यावरून अवैध उपसा करून वाळू वाहतूक करणारी वाहने पकडून मालेगाव तहसीलच्या आवारात जमा करण्यात आली होती. मात्र ही वाहने तहसील कार्यालयाचे गेट तोडून पळवून नेण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती जळगाव तहसील कार्यालयात घडली आहे.आव्हाणे येथील तलाठी यांनी २५ मे रोजी ट्रॅक्टर क्रमांक एमएच.१९ ए.एन. ३५५० हे अवैध वाळूने भरलेले असल्याने दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. २८ रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी देखील असोदा रोडवर मोहन टॉकीज जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर क्रमांक एमएच.४०.एके.७७३३ हे पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारी २ वाजेच्या सुमारास लावले होते. तसेच पंचनाम्याची कागदपत्रेही तहसील कार्यालयाच्या सुपूर्द केली होती.रात्रीतून वाहने गायबनायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते हे गुरूवारी रात्री घरी गेले तोवर दोन्ही वाहने कार्यालयाच्या आवारातच होती. शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास लिपीक परवेश शेख हे आले असता त्यांना डंपर आणि ट्रॅक्टर दिसून आले नाही. त्यांनी तात्काळ सातपुते यांना कळविले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसरात पाहणी केली असता ते आढळून आले नाही. रात्री उशिरा किंवा पहाटे दोन्ही वाहने चोरी केल्याचा संशय आहे. मात्र तहसील कार्यालयाचे गेट नेहमीच बंद असते. ते कुणी उघडले? असाही सवाल उपस्थित होत आहे.दोन्ही वाहनांच्या मालकांविरूध्द फिर्यादडंपर आणि ट्रॅक्टरबाबत महसूल अधिकाºयांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती मागविली होती. ट्रॅक्टरचे मालक तुषार नरेंद्र पाटील रा.कन्हेरे ता.अमळनेर व डंपर मालक विनोद हुकूमचंद साळुंखे रा.फुपनगरी ता.जळगाव यांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहने चोरून नेल्याचा नायब तहसीलदारांनी व्यक्त केला आहे. ट्रॅक्टरची किंमत २ लाख व त्यातील १ ब्रास वाळूचे ३ हजार रूपये तर डंपरची किंमत ५ लाख रूपये व दोन ब्रास वाळूचे ६ हजार रूपये असा ७ लाख ९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तहसील कार्यालय आवारातून वाळूची दोन वाहने पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:46 PM
वाहन मालकांविरूद्ध गुन्हा
ठळक मुद्दे रात्रीतून वाहने गायब ७ लाखांचा मुद्देमाल गेल्याची तक्रार मालेगावच्या घटनेची जळगावात पुनरावृत्ती