जळगाव : ईएसआयसीच्या दवाखान्यात मुतखड्याच्या उपचारासाठी आलेल्या लीलाबाई धोंडू सोनार (वय ५५) व गजानन किसन बावस्कर (वय ३२) दोन्ही रा.चिंचखेडा, ता.जामनेर या दोघांना मागून भरधाव वेगाने आलेल्या एस.टी.बसने चिरडल्याने ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवर असलेला लीलाबाई यांचा मुलगा योगेश ऊर्फ ज्ञानेश्वर धोंडू सोनार (वय ३०), बाळू धोंडू सोनार (वय ३५) व सुरेखा बाळू सोनार (वय ३३) हे तिघे जण बालंबाल बचावले आहेत. या अपघातानंतर चालक बस सोडून पळून गेला. हा अपघात मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजता औरंगाबाद महामार्गावर कुसुंबा गावानजीक झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाबाई सोनार यांना मुतखड्याचा त्रास असल्याने मुलगा योगेश, बाळू व सून असे एकाच कुटुंबातील चौघे व योगेशचा मित्र गजानन असे पाच जण मंगळवारी जळगाव येथे न्यायालयाच्या समोर असलेल्या ईएसआयसीच्या दवाखान्यात आले होते. या दवाखान्यात त्यांचे काम झाले नाही. इतर कामे आटोपून योगेश, बाळू व बाळूची पत्नी सुरेखा असे एका दुचाकीवर तर योगेशची आई लीलाबाई ही गजानन बावस्कर याच्या दुचाकीवर असे एकाच वेळी घरी जायला निघाले. कुसुंबा गावाजवळ दोन्ही दुचाकी सोबत चालत असताना जळगाव-सोयगाव ही औरंगाबाद आगाराची बस मागून भरधाव वेगाने आली व गजानन याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात गजानन व लीलाबाई हे चिरडले गेले तर शेजारीच्या दुचाकीवरील योगेशसह तिघे लांब फेकले गेल्याने ते बालंबाल बचावले. या तिघांसाठी वेळ आली होती, पण काळ आला नव्हता अशीच परिस्थिती होती.
दोन्ही मुलांच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू
योगेश व बाळू हे दोन्ही मुले व सून सुरेखा या तिघांच्या डोळ्यासमोर आईचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेचा त्यांना प्रचंड धक्का बसला. गजानन हा योगेशचा जिवलग मित्र होता. कोणत्याही प्रसंगात, सुख-दुखात तो सावलीसारखा योगेशच्या पाठीशी असायचा. त्यांची मैत्री गावात एक आदर्श मैत्री होती. सासूचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने सून सुरेखा यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, नेरीचे पितांबर भावसार आदींनी सोनार कुटुंबीयांना धीर देऊन इतर बाबींची पूर्तता केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार तुकाराम निंबाळकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात धाव घेतली. बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे.
मृत गजानन सुप्रीम कंपनीत कामाला
मृत गजानन बावस्कर हा सुप्रीम कंपनीत कामाला होता. योगेशदेखील त्याच कंपनीत कामाला आहे. कंपनीमुळे ईएसआयसी योजनेतून आईच्या उपचारासाठी तो जळगावात आला होता. गजानन याच्या पश्चात वडील किसन गजानन बावस्कर, आई मीराबाई, पत्नी कोमल, मुलगा तुषार (वय ५) व सव्वा वर्षाची मुलगी असा परिवार आहे. लीलाबाई यांच्या पश्चात पती धोंडू पंढरी सोनार, दोन मुले व सून असा परिवार आहे.