जळगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सामरोद (जामनेर) येथील दाम्पत्य ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नशिराबादनजीक घडली. या घटनेत दाम्पत्याचा ३ वर्षीय चिमुरडा सुदैवाने बचावला आहे.
शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर) हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) अशी मयतांची नावे आहेत. तर या दाम्पत्याचा ३ वर्षीय मुलगा रुद्र हा या अपघातात बचावला आहे. कोळी दाम्पत्य जळगाव तालुक्यातील आसोदा येथील नातेवाईकांना भेटून सामरोदकडे जात होते.नशिराबाद, कुऱ्हामार्गे सामरोद जाण्यासाठी तिघे जण दुचाकीने (क्र. एमएच १९ ए ए २०९५) निघाले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास नशिराबादनजीक दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिघे जण रस्त्यावर फेकले गेले. त्यात भारतीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी शेनफडूसह रुद्रला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शेनफडूचाही मृत्यू झाला. तर रुद्र हा सुखरुप असून जिल्हा रुग्णालयात कोळी यांच्या नातेवाईकांनी धाव घेत प्रचंड आक्रोश केला.
चिमुरड्याचा आक्रोशअपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडलेला रुद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई भारतीला बघून प्रचंड भेदरला. तर वडील शेनफडू यांच्याही डोक्यातून रक्तस्त्राव सुरु असल्याने रुद्र रस्त्याच्याकडेल आक्रोश करीत होता. तेव्हा मदतकार्य करणाऱ्यांनी रुद्रला पाणी पाजले आणि कुशीत घेतले. त्याला धीर देत जिल्हा रुग्णालयात आणले. नातेवाईक आल्यावर रुद्रला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सामरोदला अंत्यसंस्कारकोळी दाम्पत्य शेती कसत असल्याचे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना या घटनेने त्यांच्या आयुष्यावर झडप घातल्याने त्यांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर शेनफडू आणि भारतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी सायंकाळी सामरोद येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, नशिराबाद पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा चालकाचा शोध घेतला जात असल्याचे नशिराबाद पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.