लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : तालुक्यातील वाघझिरा येथील अर्जुन नांदला पावरा यास यावल पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यास येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत देण्यात आली. दरम्यान, आरोपीने जिल्ह्यातील विविध विविध ठिकाणांवरुन चोरून नेलेल्या १३ मोटारसायकली आरोपीने सांगितलेल्या ठिकाणावर पोलिसांनी जप्त केल्या.
तालुक्यातील वाघझिरा येथील फिर्यादी रवींद्र दगडू महाजन यांची २८ हजार रुपये किमतीची एमएच-१९-सीएस-७२१४ ही मोटारसायकल चोरी गेल्याची फिर्याद २३ जून रोजी दिली होती.
पोलिसांनी संशयावरून गावातीलच संशयित आरोपी अर्जुन नांदला पावरा यास अटक केली. त्याने पोलीस तपासात सातपुड्यातील विविध आदिवासी पाड्यावरुन १३ मोटारसायकली काढून दिल्या. संशयित आरोपीकडून अजूनही काही मोटारसायकली जप्त करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
पथकात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, मुजफ्फरखान सिकंदर तडवी, असलमखान, संजय तायडे, सुशील घुगे, राजेंद्र वाडे, रोहील गणेश, राहुल चौधरी, भूषण चव्हाण यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील नशिराबाद, जळगाव, अमळनेर आदी शहरांतून चोरट्याने या मोटारसायकली चोरल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्यांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या असतील अशांनी यावल पोलीस ठाण्यातच संपर्क साधावा व चोरीस गेलेल्या मोटारसायकलची खात्री करून घ्यावी, असे आवाहन पो. नि. सुधीर पाटील यांनी केले आहे.