फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शनिपेठतील गोपालपुरा येथून अपहरण झालेल्या बालकांचा तपास करीत असतानाच गणेश उर्फ गुंठ्या भल्या पावरा (वय २० रा. बोरमळी ता.चोपडा) हा अट्टल दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गवसला. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २५ दुचाकी जप्त केल्या.
शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. याच काळात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन बालकांचे अपहरण झाले होते. संशयितांचा चोपडा तालुक्यात वावर असल्याने समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या भागात लक्ष केंद्रित केले होते. त्याचा तपास करीत असतानाच हवालदार अशरफ शेख यांना गणेश उर्फ गुंठ्या हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी श्रीकृष्ण पटवर्धन, अशरफ शेख, सुनील दामोदरे, प्रदीप पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दीपक शिंदे, मुरलीधर बारी यांच्या पथकावर जबाबदारी सोपवली.
या पथकाने संशयिताच्या शोधार्थ तब्बल दहा दिवस सातपुडा जंगलात मुक्काम केला. याचदरम्यान संशयित गणेश पावरा हा चोपडा शहरात एका ठिकाणी दारु पिऊन झोपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एकूण २५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी जळगाव शहर पोलीस स्टेशनला चार, जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात एक, तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एक आणि चोपडा शहर व चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस ठाणे असे एकूण १५ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भाड्यानेही द्यायचा दुचाकी
संशयित गणेश हा दुचाकी चोरल्यानंतर अवघ्या १० ते १५ हजारांत दुचाकीची विक्री करायचा. दरम्यान काही जणांना तो पैसे घेऊन भाड्यानेही दुचाकी देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चोरीची दुचाकी खरेदी करणार्यांनाही चौकशीअंती गुन्ह्यात आरोपी करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक बकाले यांनी सांगितले. हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी बोरमळी येथील बाबूराव बुटा पाडवी याचीही महत्त्वाची मदत पोलिसांना झाली.
मध्य प्रदेशात बेड्यासहित ठोकली धूम
दरम्यान, संशयित गणेश याला गेल्या काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेश पोलिसांनी एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी हाताच्या बेड्यासहित मध्य प्रदेश पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.