जळगाव : तापीकाठावरील चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, यावल, जळगाव, अमळनेर भागात बागायती क्षेत्रात मेंढपाळ, काठेवाडी बांधव आपले पशुधन घेऊन दाखल झाले आहेत. अशात दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे.अजंदे ता.रावेर येथे मागील आठवडय़ात 190 मेंढय़ा शेतानजीक डबक्यातील पाणी प्यायल्याने दगावल्या होत्या. या मेंढय़ाचा मृत्यू युरीयायुक्त पाण्यानेच झाल्याचा अहवाल जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. नाशिक येथील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यातच अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथेही दुभत्या गायी दगावल्याचा प्रकार समोर आला असून, यासंदर्भातही शवविच्छेदन करून त्यासंबंधीचा अहवाल, नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने दिली. सूक्ष्मसिंचन (ड्रीप)द्वारे दिलेली खते पाण्याद्वारे डबक्याततापीकाठावर केळी बागा अधिक आहेत. शेतकरी मजूरटंचाईवर मात आणि तांत्रिक शेतीवर भर म्हणून आता थेट फर्टिलायझर टॅँक, व्हेंचुरीद्वारे विद्राव्य खते विरघळवून त्याचा सूक्ष्मसिंचन प्रणालीद्वारे (ड्रीप) केळीला पुरवठा करतात. अर्थातच संबंधित शेतातील पूर्ण जलवाहिनीत खतांचा अंश असतो. या जलवाहिनीतून, सूक्ष्मसिंचनाच्या नळ्य़ांमधून जे पाणी बाहेर पडते त्यातही या खतांचा अंश मोठय़ा प्रमाणात असतो. हे साचलेले पाणी कुठलीही व्यक्ती, पशुधन यांना पिण्यास अयोग्य व घातक आहे. अर्थात हेच पाणी प्यायल्याने अजंदे शिवारातील मेंढय़ा दगावल्या व मेंढपाळ बांधवांचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती नसल्याने भरपाईचा प्रश्नपूर, वीज पडणे, वादळ, घर पडणे आदी घटनांमध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसानग्रस्त पशुधनमालकांना शासन भरपाई देते. जि.प.तर्फे तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला जातो, पण अजंदे किंवा अंतुर्ली येथील मेंढय़ा व गायी दगावल्याची घटना ही नैसर्गिक आपत्तीमध्ये नाही. त्यामुळे संबंधित घटनांमध्ये भरपाईचा कुठलाही प्रस्ताव नाही. फक्त पालकमंत्री, मंत्री स्तरावर या घटनांबाबत भरपाईचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातर्फे मिळाली. मेंढपाळ, काठेवाडी बांधव मोठय़ा संख्येने तापीकाठ व इतर भागात आपल्या पशुधनासाठी आले आहेत. त्यांनी पशुधनाला पाणी पाजण्यासाठी नेताना डबक्यातील पाणी पाजू नये. साचलेले डबके केळीच्या शेतातील ड्रीप, जलवाहनीमुळे निर्माण झाले का, हे पाहावे. -डॉ.पी.एस.इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.
सूक्ष्मसिंचनाद्वारे खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी
By admin | Published: April 07, 2017 7:11 PM